सुपा/नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग काल (दि.३०) रोजी पुन्हा जोरदार पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती भाग जोरदार झोडपला. रात्री ९ ते ११ दरम्यान जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भीज पावसावर शेतकर्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, तूर, जनावरांसाठी मका, कडवळ आदींची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. रिमझिम पावसावर का होईना पिकांची उगवण चांगली झाली. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर चारही महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली होती. पीक तर जाणार पण माझ्या जनावरांसाठी चारा होईल या आशेवर बळीराजा दिवसामागून दिवस काढत होता. पेरणी झाल्यानंतर पावसाचा थेंबही न पडता शेतात पिके डौलू लागली.
मात्र निसर्गाच्या मनात काही औरच होते. गेली चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आणि कोट्यवधी रुपयांचे शेतीमालाचे नुकसान झाले. गारांचा अक्षरशः सडा पडला. यात कांदा, केळी, सिताफळ, डाळींब, ज्वारी सह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गामुळे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू दाटले.
सुपा परीसरात वाळवणे, रूईछत्रपती, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, कडूस, आपधूप, पळवे, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतानपूर, मुंगसी, हंगा, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीदी, रायतळे, अस्तगावात देखील गुरूवारी सायंकाळ पर्यंत आकाशात ढग नव्हते.
सात नंतर आकाशात ढग भरून आले व एकाएकी पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान काढणी केलेला कांदा जाग्यावर भिजला. पाऊस आणि वारा इतका जोराचा होता की रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.