पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडलातील दहा ते बारा गावातील शेतकरी गारपिटीने उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या बाधित शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपयाची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केली.
कांदा पिकासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरावून घेतला. हे नुकसान न भरून येणारे आहे. पंचनामे व त्यानंतर मदत येण्यास होणारा उशीर पाहता शासनाने या भागातील शेतक-यांना एकरी २५ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, त्यानंतर नुकसान पाहून अधिकची मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार विजय औटी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
तालुक्यातील वडुले यासंह निघोज, पठारवाडी, जवळा व अन्य गारपीटग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार औटी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य डाॅ.भास्कर शिरोळे, डाॅ.श्रीकांत पठारे, अनिल शेटे व अन्य शिवसेना पदधिका-यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
औटी म्हणाले, मोठ्या प्रमाणात या अगोदर कधी तालुक्यात गारपीट झाली नाही. पंचनामा व त्यानंतर सर्व प्रस्ताव शासनस्तरावर जाण्यास विलंब होतो. २०२२ चे नुकसानीच्या अनुदानापासून अर्धे शेतकरी अद्याप वंचित आहेत ही गंभीर बाब आहे. ही सर्व प्रक्रिया राजकीय पदाधिकाऱ्यांनी समजावून घेऊन ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे औटी म्हणाले.
ई पीक पाहणी नोंदणीस शेतकऱ्यांना अडचणी
ई पीक पाहणी नोंद करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पिकाची नोंद न झाल्यामुळे पीक विमा मिळण्यास अडचणी येत आहेत. शासन सर्वत्र संगणीकरण करत आहे, परंतु शेतकऱ्यांना या सर्व बाबी ऑनलाईन करण्यास अडचणी येत आहेत, याचाही विचार व्हायला हवा – माजी आमदार विजय औटी