पारनेर / नगर सहयाद्री : रविवारी (दि.२६) झालेल्या गारपीटीने पारनेर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यावेळी एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गारांचा पाऊस आपल्या अंगावर झेलला. दादाभाऊ पांढरे असे त्यांचे नाव आहे.
गारांपासून आपल्या नातवाचे त्यांनी संरक्षण केले परंतु त्यांची गारपिटीने त्यांची पाठ काळी निळी पडली होती. सध्या या आजोबांची चर्चा गांजीभोयरे व परिसरात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शासन व प्रशासनाच्या वतीने या घटनेची कोणती दखल घेतली गेली नसून साधी चौकशीही पुढार्यांनी अथवा अधिकार्यांनी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रविवारी निघोज मंडळातील २४ गावांत गारपिटीने शेतकरी उध्वस्त झाला. गांजीभोयरे गावातील पांढरे परिवारातील नाना पांढरे यांचे वडील दादाभाऊ पांढरे हे रविवारी आपली जनावरे रानात चारत असताना अचानक दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारा पडू लागल्या. लहान पाच वर्षांचा नातू सोबत असल्याने व जवळपास कुठलाही आडोसा नसल्याने आजोबांनी आपल्या पाच वर्षांच्या नातवाला पोटाखाली धरले व स्वतः गारांचा भडीमार आपल्या पाठीवर झेलला.
वाडीवस्तीवरील इतर काही इसमांना गारपिटीचा फटका बसला. सुमन शहाजी पांढरे ही महिला गारांच्या माराने व बाभळीची फांदी अंगावर पडल्याने बेशुद्ध पडली. गारपीटने हातात आलेली सोन्यासारखी पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्यांना द्यावी ही विनंती बळीराजा करत आहे.