शिर्डी / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. एल लग्न समारंभात विषबाधा झाल्याने तब्बल दीडशे लोकांना त्रास होऊ लागला आहे. हा लग्नसोहळा शिर्डी येथून जवळच रविवारी पार पडला होता. विषबाधा झालेल्या लोकांमध्ये नवरीच्या पित्याचाही समावेश आहे.
या सर्वांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शिर्डीजवळ रविवारी दुपारी हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेवल्यानंतर दहा ते पंधरा जणांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास होऊ लागला. रात्री आठनंतर दीडशेहून अधिक जणांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने अनेकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. वधूच्या वडिलांनाही पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता.
नातेवाईक व आयोजकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. येथील रहिवासी साईनाथ रुग्णालय तसेच साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी येत होते. साईबाबा रुग्णालयात ३५ जणांना तर साईनाथ रुग्णालयात १०० हून अधिक जणांना दाखल करण्यात आले आहे.
यातील काहीजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगाव यांनी दिली. त्यातील एक अतिदक्षता विभागात तर इतर सामान्य प्रवर्गात आहेत. विषबाधेमुळे लग्न समारंभात एकच धावपळ उडाली आणि नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली.