एलसीबीची कामगिरी | जेलमधून पळालेल्या सहा जणांना बेड्या | १० हजारांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर। नगर सहयाद्री
संगमनेर सबजेलमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींनी जेवणासाठी मित्राकडून चहावाल्याच्या फोन पेवर पैसे मागविले अन तिथेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास करुन चार आरोपींसह त्यांना मदत करणार्या दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून १ गावठी कट्टा, सहा जीवंत काडतूस, मोबाईल असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
८ नोव्हेंबरला संगमनेर सबजेलमधील बॅरेक क्रमांक तीनमधील न्यायालयीन कोठडीतील कैदी राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबू ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव हे सकाळी पावणे सातच्या दरम्यान बॅरेक क्रमांक ३ चे दक्षिणेकडील खिडकीचे ३ गज कापून पांढर्या रंगाच्या कारमधून अज्ञात इसमासह पळून गेले होते. पोहेकॉ आनंद बबनराव धनवट यांच्या तक्रारीवरुन संगमनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आहेर यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन घटनेचा अभ्यास करुन व तांत्रिक विश्लेषणाच्या तपास करुन आरोपींना आणि त्यांना पळून जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा सहा आरोपींना जामनेर (जि. जळगांव) येथून वाहनासह पकडले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, पोकॉ अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोहेकॉ संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ/जायभाय यांच्या पथकाने पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
पळून जाण्याचा एक महिन्यापासून प्लॅन
न्यायालयीन कोठडीतून पळून जाण्याचा प्लॅन आरोपी एक महिन्यापासून करत होते. बराकीतील फॅन, कुलरचा आवाज सुरु असतांना गज कापण्याचे काम करत. गज कापण्यासाठी लागणारे साहित्य कोणी पुरविले, आरोपींना कोणी मदत केली, याचाही तपास करण्यात येत आहे. पळून जाण्यासाठी भाड्याचा गाडीचा वापर केला, पळून जाताना यार्डातील कर्मचार्याला गंभीर दुखापत झाल्या प्रकरणी आरोपींवर ३०७ चा गुन्हा दाखल केला असून तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. याची चौकशी चालू आहे. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक विजय करे पुढील तपास करीत आहेत.