अहमदनगर / नगरसह्याद्री :
प्रवाशांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. महेश भालचंद्र मोरे (वय २५), अजय माणिक घेंगडे (वय 19, दोन्ही रा. राजापुर माठ, ता.श्रीगोंदा), राहुल प्रभु गव्हाणे (वय 20, रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा) असे आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी : नितीन विठ्ठल अडागळे (वय 33, रा. बोरी, ता. श्रीगोंदा) हे आपल्या स्कॉर्पिओमधून लोणी व्यंकनाथ रस्त्याने जात होते. 4 इसम मोटार सायकलवर पाठीमागून आले.
त्यांनी स्कॉर्पिओ थांबवली व नितीन अडागळे यांना गाडीतून खाली खेचले. त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून कोत्याचा धाक दाखवत 1 लाख 16 हजारांची रोख रक्कम, 2 मोबाईल चोरून नेले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 21 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून तपास करण्याचे आदेश दिले होते. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार महेश मोरे व अजय घेंगडे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यांनी इतर साथीदार राहुल गव्हाणे, प्रतिक ओहळ, अथर्व चौधरी व काळ्या यांना सोबत घेऊन गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.