अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरातील एमआयडीसी परिसरात ४० वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी ही घटना उघडकीस आली. सह्याद्री चौकातील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात हा मृतदेह सापडला. संदीप उर्फ बाळू शेळके (रा.गजानन कॉलनी, अहमदनगर) असे या मृत इसमाचे नाव असल्याचे समजते.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी परिसर येतो. येथे कामानिमित्त परप्रांतीय लोक वास्तव्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात संघटनामध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी येथेच व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाला होता.
शुक्रवारी उघडकीस आलेल्या घटनेतही प्रथमदर्शनी पाहता हा दगडाने ठेचून खून झाल्याचे समजते. या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
एमआयडीसी हद्दीत गुन्हेगारी चांगलीच वाढली असून एमआयडीसी परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
खुनाला अवैध धंद्याची किनार?
गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात अवैध धंद्यातून अनेक घटना घडल्याचे वास्तव आहे. शेळके याच्या खुनामागे अवैध धंद्याची किनार असल्याचे बोलले जात आहे. अवैध गोष्टीच्या वादातून हा खून झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
गळा आवळून काहून, चेहरा दगडाने ठेचला
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सदर व्यक्तीचा खुन गळा आवळून आणि संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मयत व्यक्तीची ओळख पटत नव्हती. पण, मयताची ओळख त्याच्या खिशात सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून करण्यात आली आहे. यानुसार, संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. संदीप गजानन कॉलनी नवनागापूर येथे हा मयत व्यक्ती वास्तव्याला होता. विशेष म्हणजे हा मयत व्यक्ती कोपरगाव येथील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता.