अहमदनगर । नगर सहयाद्री:-
लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये असं काही घडलं की, अवघ्या २४ वर्षाच्या विवाहित तरुणीला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली. तेजल संग्राम भापकर (वय २४ रा. चेतना कॉलनी, नबनागापूर) असे आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवरा, सासू, सासरे व नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास, सासू सासऱ्यांकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या सर्वांना कंटाळून अवघे २४ वर्ष वय असलेल्या विवाहितेने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. नवनागापूरच्या चेतना कॉलनीत ही घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी: मयत तेजल हिचा विवाह दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी भापकर कटुबातील संग्राम याच्याशी झाला होता. मात्र संग्राम याचे लग्नापूर्वी पासून शेजारच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यावरही ते सुरूच होते. याची माहिती तेजल हिला समजल्यावर तिने विचारणा केली असता संग्राम याने तिला मारहाण करत त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच तिला माहेरून पैसे आणण्यास सांगू लागला. एकदा तिने माहेरून १ लाख रुपये आणूनही दिले होते. मात्रत्याची मागणी वारंवार होऊ लागली. तिला होणाऱ्या त्रासाबाबत तिने माहेरी सांगितलेही होते.
सन २०२३ च्या सुरुवातीला नवऱ्याच्या बाहेरील प्रेमसंबंधांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाले. त्यामुळे तिने स्वतः हातावर ब्लेडने वार करून घेतले होते. त्यावेळी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर १७ दिवस ती माहेरी राहिली. त्यावेळी सासू संगीता, सासरे विठ्ठल भापकर व त्यांचे आणखी एक नातेवाईक तिच्या माहेरी गेले. यापुढे असे होणार नाही असे सांगत तिला सासरी घेवून आले. मात्र तिच्या नवऱ्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. उलट ती महिलाही तेजल हिला त्रास द्यायला लागली. तू नवऱ्याला सोडून जा म्हणत धमकावू लागली. नवरा ही शिवीगाळ मारहाण करत होता. सासू सासरे मात्रत्यांच्या मुलाचीच बाजू घेत तेजल हिच्याशीच वाद घालून तिला त्रास देत होते.
या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजल हिने बुधवारी (दि.११ सप्टेंबर) सायंकाळी राहत्या घरात फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत प्रारंभी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र गुरुवारी (दि. १२) रात्री मयत तेजल चे वडील पाटीलबा मारुती थेटे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी नवरा संग्राम विठ्ठल भापकर, सासू संगीता विठ्ठल भापकर, सासरा विठ्ठल पोपट भापकर आणि नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.