अहमदनगर / नगर सह्याद्री : शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला आहे. ता टप्पाटप्प्याने निधी प्राप्त होत आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्प पुरवणी यादीत शहरातील विविध रस्त्यांसाठी 33 कोटी 43 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासाला गती मिळाली आहे अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. शहराच्या विकासासाठी मिळालेल्या 33 कोटी 43 लाख निधीमध्ये पुढील विकासकामांचा समावेश असेल. तारकपूर-पत्रकार चौक – डीएसपी चौकापर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केडगाव लिंक रोड रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून उर्वरित राहिलेल्या कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
नगर शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी बुरूडगाव साळुंखे मळा ते अहमदनगर महानगरपालिका कचरा डेपोपर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी तीन कोटींचा निधी, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर असून उर्वरित नेप्ती बायपास पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी चार कोटींचा निधी, केडगाव-लोंढे मळा – सोनेवाडी रस्ता (बायपास पर्यंत) कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटींचा निधी, नगर शहराला जोडणारा वाकोडी भिंगार नाल्यावरील पुलाच्या कामासाठी २ कोटी ४४ लाख निधी मंजूर झाला आहे.