पारनेर / नगर सह्याद्री :
Ahmednagar News : तालुक्यातील चोंभूत मध्ये जलजीवन मिशन काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. असा आरोप ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील मधू पारखे, प्रणल पोपट भालेराव, योगेश दौलत बरकडे यांनी केला आहे.
यासबंधीचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद अभियंता व पंचायत समिती यांना देण्यात आले. हे काम करताना अनेक पक्के डांबरी रस्ते व सिमेंट रस्त्यांचे मोठे नुकसान करण्यात आलेले आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जलजीवन कामाच्या अंदाज पत्रकामध्ये जलजीवन योजनेमधील पाइपलाइनचा सर्वे ज्या वस्त्यांसाठी झाला आहे प्रत्यक्षात तिथे काम झालेले नाही. तसेच भक्कम रस्त्याच्या साईडपट्ट्या उध्वस्त केल्या जात आहेत. तसेच रस्त्याच्या मध्ये रस्ता फोडला आहे.
तसेच अजूनही कामाच्या अंदाजपत्रक योजनेस प्राथमिक मान्यता दिलेली नाही अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पारखे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे. अनेक ठिकाणावरून याबाबत तक्रारी येत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेत ठेकेदारांवर योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकशी न केल्यास आंदोलन
केंद्रशासनाने जलजीवन मिशन साठी करोडो रुपये खर्च केले आहेत. ते काम गावो गावी चांगल्या दर्जाचे व्हावे आणि त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच या योजनेची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.
– स्वप्नील पारखे, ग्रामपंचायत सदस्य