पारनेर / नगर सह्याद्री : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सांगवी सूर्या, गांजीभोयरे परिसरातील शेतकरी उध्वस्त झाला. शेती तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. हे लक्षात घेता सुजित झावरे पाटील यांनी घोषणाबाजी न करता थेट प्रत्यक्ष कृतीवर भर देत देवकृपा फाऊंडेशनच्या वतीने जनावरांसाठी मोफत चारा वाटप सुरु केले.
मोफत चारा वाटपाचा प्रारंभ आज पानोली गावातून करण्यात आला. यावेळी पानोली गावातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडवत राजकारण विरहित असणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहत सुजित झावरे पाटील यांचे कौतुक केले.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की माझ्या तालुक्यातील शेतकरी राजा संकटात असताना मी देखील अस्वस्थ होतो. परंतु हवेत पोकळ घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत राहणे हा माझा स्वभाव आहे. आज या चारा वाटपाच्या छोट्या उपक्रमातून शेतकरी वर्गाचे अश्रू पुसण्याचे, दिलासा देण्याचे पुण्य माझ्या हातातून परमेश्वर घडवत आहे, हे मी माझे भाग्य समजतो तसेच या उपक्रमासाठी राजकारणविरहित सर्वपक्षीय पानोलीकरांनी एकजूट दाखविली त्यांनाही धन्यवाद देतो असे ते म्हणाले.
यापूर्वीही तालुक्यामध्ये ज्या वेळी अस्मानी संकटामुळे बळीराजा त्रस्त झाला त्यावेळी सुजित झावरे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्ते केले. रविवारी वडुले, सांगवी सूर्या, गांजीभोयरे या गावात चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देवकृपा परिवारातील सदस्यांनी दिली.