अहमदनगर / नगर सह्याद्री : दुधाचे दर, कांदा निर्यात बंदी आदी समस्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मंगळवार (दि.१२ रोजी) काँग्रेस पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते.
यावेळी दुधाला हमीभाव मिळावा, कांद्याची निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मिती बंदीचे आदेश त्वरित मागे घ्यावेत, अग्रीम विमा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळावा, गारपीटग्रस्त अनुदान मिळावे व दुष्काळग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात, मागील अतिवृष्टीचे थकित अनुदान लवकरात लवकर जमा करावे, ऑनलाईन पीक पाहणी रद्द करावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की, शासन जाहिरातीवर अमाप खर्च करत आहे. परंतु शेतकरी संकटात असताना मात्र मदत करत नाही.
शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असताना शेतकरी गांभीर्याने ते घेत नाही. त्यामुळे शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे नागवडे यांनी म्हटले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.