अहमदनगर | नगर सह्याद्री :
फराळ दिल्याने कोणी मोठा झाला असता तर हलवाईवाला देखील आमदार झाला असता, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. रात्रीच्या बारानंतरची यंत्रणा अन् त्या यंत्रणेच्या अनुषंगाने झालेला चेष्टेचा विषयही त्यांनी छेडला !
राम शिंदे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे यांचे फराळ झाले असे सांगतानाच जिल्ह्यात काही मंडळींचे किरकोळ फराळ झाल्याची खिल्लीही विखे पाटलांनी उडवली. नगरसेवकांना सल्ला देताना विखे पाटील म्हणाले, रात्री नऊ नंतर झोपा, कारण रात्री बारानंतर काम करणारी काही लोक आहेत, त्यांना त्यांच काम करु द्या ! रात्री बारानंतरची त्यांच्यासारख्यांची ‘ती’ मेहनत मी करु शकत नाही, असा टोला खा. विखे पाटील यांनी लगावताच उपस्थितांत हशा पिकला.
कल्याण रस्त्यावरील नेप्ती नाका चौकाजवळील पुलाच्या कामाचा शुभारंभ खा. विखे पाटील आणि आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नामोल्लेख टाळत विखे पाटलांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यावर टिकास्त्र सोडले आणि साखर वाटप करण्याच्या मुद्यावर विक्रम राठोड यांचा नामोल्लेख टाळत तुम्ही तीस वर्षे साखर का नाही वाटली, असा सवालही उपस्थित केला.
रात्री बारा वाजल्यानंतरची ‘ती’ मेहनत मी करु शकत नाही, हा विखे पाटलांचा टोला पारनेरचे आ. नीलेश लंके व त्यांच्या यंत्रणेला होता हे नक्कीच ! माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी लंकेंच्या याच यंत्रणेवर बोट ठेवले होते आणि रात्री बारानंतर कोण कोणाच्या दाराच्या कड्या वाजवते, याची जाहीर वाच्यता केली होती. रात्री बारानंतर ते काम करतात, असे म्हणातानाच मी त्यातला नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. रात्री बारानंतरची ‘ती’ मेहनत मी करु शकत नाही, हे सांगताना त्यांचा रोख आ. नीलेश लंके व त्यांच्या यंत्रणेकडे होता, हेही लपून राहिले नाही.
कल्याण-नगर रस्त्यावरील सीना नदीवरील या पुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ते प्रत्यक्षात सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान येणार्या दीड वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल, असे आश्वासन खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिले. आमदार संग्राम जगताप आणि माझ्या हातून अशी अनेकविध कामे मार्गी लागत आहेत. अनेक लोकांना आम्ही सोबत कुठे असलो की खटकते.
परंतु विकासासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलासाठी सुमारे साडे सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. समाजात काम करताना खूप लोक टीका करत असतात, पण जो समाजासाठी काम करतो त्याच्यामागे जनता ठामपणे उभी असते. त्यामुळे टीका करणार्यांनी विकासकामे न करता केवळ विरोध करत रहावा, आम्ही विकासकामे करत राहू.
आमदार आणि खासदार यांचे विकासाचे धोरण एकच आहे. सर्वसमावेशक विकसित अहमदनगर शहर पहायचे असेल तर स्थानिक प्रतिनिधींनी देखील राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही खासदार विखे यांनी केले.
खा. विखे म्हणाले, उत्तर नगरमध्ये जशी दिवाळी गोड झाली, तशीच दिवाळी दक्षिणमध्ये सुद्धा होईल. कारण यंदा जिल्ह्यात दोन वेळा दिवाळी साजरी होणार आहे. प्रभू श्री राम जेव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळे दिवाळी साजरा झाली. ही पहिली दिवाळी आपण नुकतीच साजरी केली. परंतु यंदा दुसरी दिवाळी २२ जानेवारीला होणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्त नगर जिल्ह्यात दुसरी दिवाळी साजरी होईल. २२ जानेवारीला नगर दक्षिणची दिवाळी गोड होणार, त्याची काळजी तुम्ही करू नये. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. सध्या नगर-कल्याण रोडची गंभीर अवस्था पाहायला मिळत आहे. येत्या एका महिन्यात आमदार संग्राम जगताप आणि माझ्या माध्यमातून या रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर करून पुलापासून ते अमरधामपर्यंत पेव्हींग ब्लॉक बसवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, कल्याण रोड परिसरात मोठे उपनगर निर्माण होत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविल्यामुळे लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सत्तावीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. शहराचे रूप बदलत आहे. पावसाळ्याप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये बेडूक डराव डराव करत असतात. निवडणुका संपल्या की बांडगुळ गायब होत असतात. कधी कधी त्यांच्यावर फवारणी करावी लागते.
सीना नदीची हद्द निश्चित झाली असून खुली करण्याचे काम मार्गी लावावे लागणार आहे. पूररेषा कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. सीना नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून जाते. त्यामुळे पंधरा-सोळा तास वाहतूक बंद ठेवावी लागते. पुराच्या पाण्यामुळे दुर्दैवी घटनाही घडतात. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील विकास कामांना गती येईल, असे आ. जगताप म्हणाले.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, श्याम नळकांडे, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक पुष्पा बोरुडे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, सुभाष लोंढे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, निखिल वारे, विपुल शेटिया, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, राम नळकांडे, शरद ठाणगे, वैभव वाघ, युवराज शिंदे, संदीप दातरंगे, दत्ता गाडळकर आदी उपस्थित होते.