पारनेर / नगर सहयाद्री :
Ahmednagar Politics : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची पारनेर दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीमधील गोविंद बाग येथे ही भेट झाली.
पारनेर तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत विविध विषयांची चर्चा यावेळी झाल्याचे औटी यांनी सांगितले. या घडामोडीनंतर विजय औटी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी बुधवारी माजी औटी यांच्या संकल्पनेतून एकल महिलांसोबत व वीर पत्नी वीरमातांबरोबर भाऊबीज साजरी केली. यावेळी आ. पवारांच्या गाडीचे सारथ्य विजय औटी यांनी केल्यानंतर भविष्यात तुमचे सारथ्य मी करणार असल्याचे सूचक व्यक्तव्य पवारांनी केले होते.
आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोविंद बाग येथे जाऊन शरद पवारांची भेट घेत पारनेर तालुक्यातील राजकीय व इतर घडामोडीवर अर्धा तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी कामगार क्रॉंग्रेस जिल्हा प्रवक्ता प्रितेश पानमंद, अंकुश सोबले, संतोष कावरे, पुष्कराज बोरुडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभेला शड्डू ठोकणार
पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी आमदार निलेश लंके यांच्याशी फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्याशी जवळीक वाढवली. बुधवारच्या भाऊबीज कार्यक्रमात आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीतून माघार नाही असे म्हणत दंड थोपटले.
तसेच शरद पवार यांच्या भेटीमध्ये तुमच्या सारख्या नव्या उमेदीने काम करणारा युवाशक्तीची राजकारणात गरज आहे असे उद्गार शरद पवार यांनी काढले. त्यामुळे आता येत्या विधानसभेला आ. निलेश लंके यांच्याविरोधात विजय औटी हे शड्डू ठोकणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.