चिकनची उधारी मागितल्याने दुकानदारावर सत्तुरने हल्ला
अहमदनगर | नगर सह्याद्री
उधार नेलेल्या चिकनचे पैसे मागितल्याच्या रागातून तरूणाने चिकन दुकानदारावर सत्तुरने खुनी हल्ला केल्याची घटना बाबुर्डी घुमट (ता. नगर) शिवारात मंगळवारी (दि. ५) घडली. रहेमान शेखलाल शेख (वय ४९ रा. बाबुर्डी घुमट) असे जखमीचे नाव आहे.
त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून, नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हल्ला करणार्या मंगेश सुनील पंचमुख (रा. बाबुर्डी घुमट) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने मंगेश पंचमुख याला तत्काळ ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी यांचे बाबुर्डी घुमट गावात मोहम्मद जैद नावाचे चिकनचे दुकान आहे.
मंगळवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले होते. दुपारी एकच्या सुमारास मंगेश पंचमुख दुकानावर आला. त्याने दीड किलो चिकनची मागणी केली. परंतु त्याच्याकडे पहिली उधारी असल्याने फिर्यादीने उधारीची मागणी केली. त्याला राग आल्याने त्याने दुकानातील लाकडी ठोकळ्यावर ठेवलेेला चिकन कापण्याचा सत्तरने फिर्यादीवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांचा आवाज ऐकून मुलगा तेथे आल्याने मंगेश पंचमुख तेथून निघून गेला. जबाबानुसार गुन्हा दाखल होताच मंगेश पंचमुख यास अटक केली आहे.