श्रीरामपूर : मयत व्यक्तीच्या जागेवर दुसराच व्यक्ती उभा करत, खोट्या दस्तऐवजाचा वापर करत जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला. ही घटना श्रीरामपूरमध्ये घडली.
मारिया वामन प्रभुणे यांनी दीपक सुभाष सुंबे, संतोष वसंत जाधव, अतुल मनोहर भाकरे, मधुसन रमेश खंडेलवाल, जितेंद्र राधामोहन खंडेलवाल, मीना जितेंद्र खंडेलवाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे १९८४ मध्ये सेवानिवृत्त झाले व २० जून २००१ पासून श्रीरामपूर येथून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. फिर्यादीने श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असे जाहीर ठरवून मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता. १८ जानेवारी २०२३ रोजी कोर्टाने फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे यांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे आदेश पारीत केले होते.
असे असताना दीपक सुभाष सुंबे यांनी दुसर्याच एका व्यक्तीस वामन किसन प्रभुणे म्हणून उभे केले. त्यांच्या नावाची पिंपळगाव माळवी येथे असलेली जमीन बळकावण्यासाठी खोटे जनरल मुखत्यारपत्र तयार केले.
इतर आरोपींनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात फिर्यादी या वारस नोंदीसाठी गेल्या असता त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.