श्रीगोंदा । नगर सहयाद्री
विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी माणिक डोह व वडज या दोन धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश प्राप्त झाले असून आवर्तन कालावधीत दोन दिवसाची वाढ करण्याची मंजुरी देण्यात आली असल्यामुळे लाभ धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
विसापूर धरण लाभक्षेत्रातील बेलवंडी, घारगाव, लोणी व्यंकनाथ, चिमळा, शिरसगाव बोडखा, पिंपळगाव पिसा, पिसोरे बु., हंगेवाडी, या गावांतील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.
पाणी सोडण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करत उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. बैठकीमध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते.
तर विसापूरखालील ५,५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी २०० ते २५० एमसीएफटी पाण्याची अतिरिक्त आवश्यकता होती. त्यानुसार माणिकडोह व वडज या दोन धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश प्राप्त झाले असून दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली असल्यामुळे विसापूरखालील लाभ धारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.