आ. लंके समर्थक म्हणाले ‘यांच्या’ आशीर्वादानेच ‘वाळू तस्करी’
पारनेर | नगर सह्याद्री-
Ahmednagar Breaking : महसूलमंत्री साहेब, पारनेर तहसीलमध्ये हप्तेखोरीचे रेट कार्ड जोरात!’ या मथळ्याखाली ‘नगर सह्याद्री’चे वृत्त प्रसिद्ध होताच पारनेर तहसीलमधील दलालांचे रॅकेट खडबडून जागे झाले. मुळा नदीपात्रातील नागापूरवाडी परिसरातून हजारो ब्रास वाळुचा उपसा झाल्याचा व्हीडीओ समोर आणला गेल्यानंतर तेथील वाळूसाठी घेण्यात आलेले पंधरा फुट खोलीचे खड्डे बुजविण्यासाठी रात्रीतून हालचाली झाल्या.
यासाठी वाळू तस्करांसह सर्कल आणि तलाठ्यांची फौज रात्रभर जागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाची दखल महसूलच्या वरिष्ठांनी घेतली असून तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्याच आशीर्वादाने हे सारे चालू होते, हेही आता लपून राहिलेले नाही.
मुळा नदीपात्रातून गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे. महसूलमंत्र्यांनी आदेश देऊन देखील पारनेरमधील वाळू तस्करी चालूच राहिली. त्यातूनच पळशी, नागापूरवाडी परिसरात हजारो ब्रास वाळुचा उपसा करण्यात आला. यासाठी कोणतीही परवानगी अथवा लिलाव प्रक्रिया राबवली गेली नाही.
मात्र, तरी देखील टाकळी ढोकेश्वरचा मंडळाधिकारी आणि तलाठी या दोघांनी संगनमत करत वाळू तस्करीला आशीर्वाद दिले. त्यातून मिळणार्या मलिद्यातील काही वाटा मॅडमला दिला असल्याचे या दोघांनीही वाळू तस्करांना जाहीरपणे सांगितले आहे. याबाबतचे ऑडीओ रेकॉर्डीग देखील पुढे आले आहे. तहसील कार्यालयातील मॅडम म्हणजेच स्वत: गायत्री सौंदाणे या असल्याचे आता स्पष्टपणे समोर आले आहे.
पळशी, वनकुटा, नागापूरवाडी, मांडवा या गावांसाठी पळशी येथील मंडळाधिकारी जबाबदार असला तरी येथे नियुक्त असणारा मंडळाधिकारी हा टाकळी ढोकेश्वरच्या मंडळाधिकार्याच्या हातचे बाहुले झाला असल्याची चर्चा जाहीरपणे होत आहे. पाहुण्याच्या हाताने साप मारण्यात पटाईत असणारा टाकळी सर्कल मोठा चतुर असल्याने त्याची ही हुशारी आता त्याच्याच अंगलट येण्याची शयता निर्माण झाली आहे.
महसुल प्रशासनातील वरिष्ठांनी नागापूरवाडीतील वाळू तस्करीची दखल घेतल्याचे लक्षात येताच तलाठी आणि सर्कल यांच्यासह वाळू तस्करांनी रात्री नदीपात्र आणि वाळू उपसा केलेल्या जमिनीत जेसीबी घालून हजारो ब्रास उपसा केलेले खड्डे बुजविण्याचे काम रात्रभर केल्याचे गावकर्यांनी म्हटले आहे. खड्डे बुजवले असले तरी दहा ते पंधरा फुट खोल खड्डे आजही अपूर्ण अवस्थेत दिसत असल्याने वाळू असल्याने वाळू उपसा झाला हे स्पष्टपणे दिसत आहे.