अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यात बिनबोभाट सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करायला पोलिसांना अखेर मुहूर्त गवसला. जिल्ह्यातील कोल्हार खुर्द परिसरातील हॉटेल न्यू प्रसादजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली. या परिसरात यापूर्वी देखील वेश्या व्यवसायावर पोलिस कारवाईच्या घटना घडल्या असल्याने या अनैतिक व्यवसायाला पाठबळ कुणाचे? हा सवाल वादाचा ठरला आहे.
सायंकाळी पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणाला बनावट ग्राहक बनवून सदर ठिकाणी पाठवले. हॉटेल जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम व एक ३१ वर्षीय व एक ३६ वर्षीय अशा दोन पश्चिम बंगाल येथील दोन महिला होत्या. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्या इसमाबरोबर सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेल्या तरुणाने पोलिसांच्या मोबाईलवर संपर्क करताच पोलिस पथकाने तत्काळ छापा टाकला.
या कारवाईत बगाराम गुमनाराम चौधरी, वय ३९, रा. बुडतला, ता. सिव, जि. बाडमेर, (राजस्थान) याला ताब्यात घेतले. दोन पर प्रांतीय महिलांची सुटका केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हवालदार सतीश आवारे, देविदास कोकाटे, चालक जालिंदर साखरे, महिला पोलिस कर्मचारी शालिनी सोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी आरोपी बगाराम गुमनाराम चौधरी याच्या विरोधात स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी ते कोल्हार खुर्द हद्दीत वेश्याव्यवसाय तसेच हॉटेल व धाब्यावर विना परवाना दारू विक्रीच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. पोलिस कारवाई करून देखील हे अवैध व अनैतिक धंदे खुलेआम सुरू असल्याने या धंद्याला पाठबळ कुणाचे? असा सवाल नागिरकांतून होत आहे.