नाशिक : नगर सह्याद्री
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे, भाजप आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर दराडे यांच्यासाठी ही बैठक पार पडत आहे. बैठकीत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावसार यांच्या संदर्भात या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भुजबळांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे सकाळी 10 वाजता नाशिकहून येवला मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात असूनही छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे या बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला होता. महायुतीने उमेदवार दिलेला असतानाही अजित पवार गटाने निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे