संगमनेर / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व भाजपा निवडणुक प्रमुख, संगमनेर विधानसभा अमोल खताळ यांचे तथाकथित अर्जावरुन दिनांक १८ जून २०२४ रोजी माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी करुन कार्यवाही करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना आदेशीत केले. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी त्याच दिवशी चौकशी समिती नेमुण सखोल चौकशी करणेबाबत आदेश दिले. सदर चौकशी समितीस उच्च न्यायालयाने स्थगिती देवुन विद्यमान महसुल मंत्री व तक्रारदार अमोल खताळ यांना कोर्टाने नोटीसा बजावल्या आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आलेपासुन विद्यमान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना वेळोवेळी महसुल खात्याचा गैरवापर करुन खोट्या व बनावट कथनाच्या आधारे चौकश्या व केसेस दाखल करुन त्रास देणेचे काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन विद्यमान महसुल मंत्री यांचे कार्यकर्ते अमोल खताळ यांनी दिनांक १० जून २०२४ रोजी दिलेल्या तक्रार अर्जावरील विद्यमान महसुल मंत्री यांचे आदेशान्वये जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी तातडीने चौकशी समिती गठित करुन सखोल चौकशी करणेबाबत आदेश पारीत केलेले आहेत.
विद्यमान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे दिनांक १८/०६/२०२४ रोजीचे आदेशान्वये जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी त्याच दिवशी नेमलेली चौकशी समिती रद्द होवुन मिळणेसाठी संगमनेर येथील नामवंत वकिल प्रशांत गुंजाळ व इतर-७ यांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांचे कोर्टात रिट पीटीशन नं. ७२८४/२०२४ दाखल केले. सदर पीटीशनची दिनांक २३/०७/२०२४ रोजी सुनावणी होवुन उच्च न्यायालयाने विद्यमान महसुल मंत्री यांचे आदेशान्वये जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी नेमलेली चौकशी समितीस स्थगिती देवुन चपराक दिली आहे.
तसेच विद्यमान महसुल मंत्री व अमोल खताळ यांना नोटीसा काढलेल्या आहेत. यामध्ये याचीकाकर्ते प्रशांत गुंजाळ यांचे वतीने उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील सिनीअर कौन्सिल विजय सपकाळ यांनी काम पाहिले आहे. तसेच अॅड. संदीप सपकाळ यांनी अॅड. ऑन रेकार्ड म्हणुन काम पाहिले आहे.