मुंबई | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपने देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींसह प्रलंबित विकासकामे यावर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता. यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिले आहेत. तसेच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे देखील आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितले.
मराठवाड्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये काही कामं काही कारणास्तव प्रलंबित आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या कामांना अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील कामाला गती कशी देता येईल.
या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे निलंगेकर म्हणाले. शेतकर्यांच्या बाबतीत चर्चा झाली. मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मराठवाड्याला न्याय कसा देता येईल अशी त्यांनी भूमिका घेतल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. निवडणुकीला जर डोळ्यासमोर ठेवले तर विकासात्मक प्रश्न जे असतात ते प्रश्न मार्गी लावायचे असतात असेही ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
विधानसभेसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी येत्या ८ ऑगस्टपासून राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीतून होईल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जनसन्मान यात्रेची माहिती दिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाणार आहे. जनसन्मान यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा योजनांपुरती सिमीत न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमया काय भावना आहेत, त्याही अजित पवार जाणून घेणार आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले.