मुंबई ।नगर सहयाद्री:-
एसटी कर्मचार्यांच्या संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने आणि आगामी काळात गणेश उत्सव, गौरी गणपती असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं दिसत आहे.
काल ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ६३ आगार पूर्णतः बंद होते. तर ७३ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ११५ आगारामध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती. आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाच्या काही बस रस्त्यावर धावत आहेत, तर अनेक बस रद्द झाल्या आहेत.
त्यामुळे नोकरदार, शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणार्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आले असून सरकारच्या भूमिकेकडे कर्मचारांच्या नजरा लागल्या आहे.