जामखेड। नगर सहयाद्री:-
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे पुन्हा त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रोहित पवार यांनी मागील चार वर्षांत महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप केला आहे. यामुळे, त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) विरोध करत असल्याचे समोर आले आहे.
२०१४ साली कर्जत-जामखेड मतदारसंघात काँग्रेसचे किरण पाटील हे उमेदवार होते. त्यामुळे, हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळावा, यासाठी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गटाचे काँग्रेसचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये रोहित पवार यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.