अहमदनगर / नगरसह्याद्री
सर्वात मोठी बातमी आली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीस सुरवात झाली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता नाशिकच्या दारणा धरणातून तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडले असून हळहळू पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
या प्रकरणातील हस्तक्षेप याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेसने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जमावबंदी
ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. प्रवरानदीवर येणाऱ्या रामपूर, केसापूर, मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर आदी कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत.
हे 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश समर आहेत. श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी हे आदेश दिलेले आहेत.
शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी
जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे नगर तसेच नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी सोडण्याचा निर्णय यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. जायकवाडीतील मृतसाठा यावर्षी वापरण्यात यावा, असा मतप्रवाह होता. परंतु विखे पाटील कारखाना व संजीवनी कारखान्याच्या याचिका पाणी न सोडण्याबाबत होत्या. त्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. कोळपेवाडी कारखान्याच्या याचिकेवर ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर विखे पाटील कारखान्याच्या याचिकेवर १२ डिसेंबर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत अपेक्षीत पाणी सोडले जाऊ शकते. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, विविध संघटना पाणी सोडण्याबाबत आग्रही आहेत. प्रसंगी आंदोलन करून त्यांनी पाणी सोडण्याचा आग्रह आंदोलनाच्या माध्यमातून गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाकडे धरला होता. या महामंडळाने पाणी सोडण्यात येत असल्याबाबतचे पत्र मराठवाड्यातील आंदोलकांना दिले.