नगर सह्याद्री / मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात महादेव बेटिंग ॲपची मोठी चर्चा आहे. या ॲपच्या गैरप्रकरणात अनेक दिग्गजांची नावे येत होती. आता एक महत्वाची बातमी आली आहे.
महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
महादेव ॲप काय आहे?
महादेव ॲप सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथं लोक ऑनलाईन सट्टेबाजी केली जात होती. या ॲपला भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे ॲप अद्यापही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल याला दुबईत बसून चालवत होते.
या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. सौरव चंद्राकर हा आधी रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून महादेव बुक अॅप इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत केली.