नगर सह्याद्री / जालना
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला आहे. ही घटना आज शनिवारी घडली. काही लोक दुचाकीवरून आले व त्यांनी लाठीहल्ला व दगडफेक करत काळं फासण्याचा प्रयत्नही केला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हल्ल्याला बँकेच्या निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक आणि उपसंचालकपदाची निवड बिनविरोध करण्यात आली होती. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांनी हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
राजेश टोपे हे निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेत गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे परंतु हल्ला झाला त्यावेळी कारमध्ये चालक होता. हल्ल्यादरम्यान कारवर शाई, दगड फेकण्यात आले. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या कारचेही नुकसान झालं आहे.
निवडणूक बिनविरोध झालेली असताना काही लोकांनी हिंसक मार्ग पत्करला. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.