अहमदनगर। नगर सह्याद्री
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर व लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते एम.आर.आय. सेंटरचा लोकार्पण करण्यात येणार आहे.
सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल अहमदनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर रोहिणी शेंडगे, भाजपा शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
एम.आर.आय. मशीन प्रकल्प हा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत मार्च २०१९ मध्ये या योजनेच्या अंतर्गत महानगरपालिकेस ३ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी सदरील सेंटर विकसित करण्यासाठी प्राप्त झाला होता.
निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि लोकमान्य मेडिकल स्टोअर्स, पुणे या संस्थेला टर्न की प्रोजेक्टद्वारे हे काम सोपविण्यात आले होते. तसेच या एम.आर.आय. सेंटरचे दर इतर खाजगी सेंटरच्या तुलनेत कमी करणेबाबत मा. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानुसार ठरविण्यात आले आहेत.
सेंटर चालवण्याची जबाबदारी लोकमान्य मेडिकल स्टोअर, पुणे या संस्थेला देण्यात आली असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरातील व जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेली ही एम.आर.आय. सुविधा निश्चितच अनेक नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
याशिवाय भविष्यात शासनाकडून विविध योजनेअंतर्गत उदा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना इ. मध्ये या सेवेचा समावेश झाल्यास त्या लाभार्थ्यांना सदरील सुविधा मोफत देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या दृष्टीने ही सेवा अतिशय हितकारक ठरणार आहे.