spot_img
अहमदनगरकलेक्टर साहेब, लेसर लाईट्सवर घालाच बंदी!

कलेक्टर साहेब, लेसर लाईट्सवर घालाच बंदी!

spot_img

कानठळ्या बसविणार्‍या डीजेबंदीचा आयजी दत्तात्रय कराळे यांचा आदेश एसपी राकेश ओला साहेबांची टीम अमलात आणणार का?

गणेशोत्सव नव्हे आमदारकीचं शक्तिप्रदर्शन | कानठळ्या बसविणार्‍या डीजेंच्या भिंती रस्त्यावर येण्याआधी पोलीस का घेत नाहीत ताब्यात?

मोरया रे…. / शिवाजी शिर्के
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा खर्‍या अर्थाने कार्यकर्ता घडविणारा गणेशोत्सव! मात्र, अलिकडे त्याचे स्वरुप हिडीस झाले हा बाप्पांचा आरोप मलाही मान्यच करावा लागला. मंडळांचे देखावे खुले होत असल्याने मी फेरफटका मारला. डीजे, डॉल्बी अन् सोबत लेसर लाईटचा मुक्त वापर! आवाजाने कान तर बधीर झालेच पण डोळ्यांनाही त्रास झाला. बाप्पा आजच्या भेटीत काय बोलणार याची उत्सुकता लागून होती. सकाळी कार्यालय गाठले! समोर बाप्पा बसलेलाच होता!

श्रीगणेशा- गुडमॉर्निंग भक्ता!

मी- बाप्पा, चक्क इंग्रजीत बोललास! अरे आपण मराठमोळी माणसं! सुप्रभात, शुभसकाळ असं बोलण्याऐवजी ‘गुडमॉर्निंग’!

श्रीगणेशा- मराठीत बोललेलं तुम्हा भक्तांना ना उमगतं ना समजतं! अरे काल तुला मी आवाज देत होतो. देखावे पाहण्यात तू इतका काय तल्लीन झाला होतास!

मी- बाप्पा, मी नाही ऐकला तुझा आवाज!

श्रीगणेशा- कसा ऐकू येईल माझा आवाज! डीजेचा दणदणाट! गौतमी पाटीलच्या लावण्या अन् सोबत लेसर लाईट! डेसीबल्सची मर्यादा आताच ओलांडणारी तुमची मंडळे, मला निरोप देताना आणखी किती मर्यादा ओलांडतील ते माहिती नाही! मात्र, आगमनाच्या दिवशीपेक्षा हा डेसीबल नक्कीच वाढलेला असणार! त्यात जोडीला काही बेवड्या भक्तांचा राडा होणारच!

मी – बाप्पा, काळजी करु नकोस! आमचे नगरचे पोलिस खमकी भूमिका घेऊन असणार आहेत. कायदा मोडणार्‍यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच अधिकार्‍यांनी भरलाय!

श्रीगणेशा- वेड्यात काढतोस का मला! अरे, आगमनाच्या दिवशी पोलिसांच्या समक्ष माझ्या कानठळ्या फुटल्या! दोन दिवस कान बहिरे झाल्यागत होते. यावेळी नगरकरांमध्ये जास्तच उत्साह दिसतोय! निवडणूक हेच त्यामागील कारण दिसतेय! त्यांची होईल रे निवडणूक! पण, माझ्यासह माझ्या सामान्य भक्तांना का धरता तुम्ही वेठीस? डीजेला बंदी असतानाही डीजेच्या भिंती उभ्या केल्या जातात! खरं तर गणेश मंडळांकडून अशा भिंती उभ्या केल्या जात असतानाच त्या ताब्यात घेण्याचे धाडस पोलिस का करत नाहीत! कानांची तर वाट लागलीच आहे रे! पण, आता लेसर लाईटसचा वापर सुरू झालाय! डोळ्यांसाठी या लाईटस अत्यंत धोकादायक आहेत. मिरवणुकीतील या लेसर लाईटसवर बंदी घालण्याची गरज आहे. कोल्हापूरमध्ये मिरवणुकीत अशा लेसर लाईटसवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिलेत! तुमच्या नगरमध्ये अद्याप तरी असा आदेश निघाल्याचे दिसून येत नाही. कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचे अनुकरण करा, असं मी म्हणणार नाही! मात्र, कानांचे पडदे फाडणारे डीजे बंद करण्याबाबत आदेश असूनही त्यावर कारवाई करताना पोलिस दिसत नाहीत! त्याहीपेक्षा भयंकर प्रकार आहे तो लेसर लाईटसचा! कोल्हापूरमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत लेसर लाईट्स बंदीचा आदेश लागू करण्यात आला असून या आदेशाचे भंग करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या आदेशानुसार आता तेथील पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी अथवा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांना या लेसर लाईटसचा त्रास झाल्याचे नेत्रतज्ज्ञांच्या संघटनेने केलेल्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. लहान मुले आणि महिलांना या लाईटसचा सर्वाधिक त्रास होतो. त्यातून अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत देखील झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. खरं तर नेत्रतज्ज्ञ असणार्‍या डॉक्टरांच्या संघटना कोल्हापूरमध्ये या विरोधात एकवटल्या आणि त्यांनीच जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत मागणी केली. नगरमधील संघटनांकडून अद्यापतरी अशी मागणी केल्याचे समोर आलेले नाही.

मी- नगरमधील नेत्रतज्ज्ञांची संघटना संपूर्ण देशात सामाजिक बांधीलकी जपणारी अग्रणी संघटना आहे. नक्कीच त्यांच्याकडून याबाबत पत्रव्यवहार होईल!

श्रीगणेशा- अत्यंत घातक असणार्‍या डीजे बंदीबाबत बोलले जाते, मागणी केली जाते. मात्र, प्रशासन त्याबाबत काहीच का करत नाही! फक्त गुन्हे दाखल होतात आणि पुढे काहीच नाही! आतापर्यंत गेल्या दहा- बारा वर्षात अनेकांवर या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले. काय झाले त्या गुन्ह्यांचे! किती जणांना शिक्षा झाली! फक्त कागदी घोडे नाचविण्यात पोलिस धन्यता मानत आले आहेत. खरेतर मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डीजेच्या मोठ्या डेसीबल्सच्या भिंती वाहनावर बांधल्या जात असतानाच ताब्यात का घेतल्या जात नाहीत! मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिसांवर मग मंडळांचे कार्यकर्ते चिडतात! त्यात हमरीतुमरी होते! कधीकधी मुद्याची गोष्ट गुद्यावर येते! यावर्षीचा माझा उत्सव माझा राहिलाच नाही. हा उत्सव शक्ती प्रदर्शनाचाच दिसतोय! महिना- दोन महिन्यात निवडणूक असल्याने आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांनी या माझ्या उत्सवाचे औचित्य साधून जोरदार शक्ती प्रदर्शनाची आणि मिरवणुकीत कोणी आडवे आले तर त्याला सरळ करण्याची तयारी आतापासूनच सुरू केली असल्याची माझी माहिती आहे. डीजे अन् लेसर लाईट्सच्या माध्यमातून हातघाई होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक शांतता याचा विचार करता तुमच्या जिल्हाधिकार्‍यांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. सिद्धराम सालीमठ हे त्यांच्या समयसुचकतेतून निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे नगरकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत! लेसर लाईटस्च्या मुद्यावर त्यांनीच स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे आणि मिरवणुकीत लेसर लाईटस वापरण्यास पूर्णपणे बंदी करण्याचे आदेश काढण्याची आवश्यकता आहे. डीजे बंद झाला पाहिजे ही भूमिका आयजी असणार्‍या दत्तात्रय कराळे यांनी नगरमध्येच मांडली असल्याने त्या भुमिकेला नगरचे पोलिस छेद देतात की तोच आदेश समजून डीजेवर कारवाई करतात हेही पहावे लागणार आहे.
(निघण्याची वेळ झालीय, असं म्हणून बाप्पानं माझा निरोप घेतला आणि मीही माझ्या कामाला सुरुवात केली.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...