जामखेड | नगर सह्याद्री –
MLA Rohit Pawar : आ. रोहित पवार [NCP] यांच्या संघर्षयात्रेवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कर्जत जामखेड बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार जामखेड बंद ठेवण्यात आले. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा काल मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भवनावर जाऊ पाहणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवत बळाचा वापर केल्याचा आरोप होत आहे.
पोलिसांनी यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकारची ही दडपशाही असून याचा निषेध म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संतप्त झाला. आज बुधवारी जामखेड बंदची हाक जामखेड राष्ट्रवादीने दिली होती. जामखेड राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, प्रकाश सदाफळ, विजय गोलेकर आदींनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.