लोकसभा निवडणुकीसाठी आ. लंके सज्ज | मतदारसंघातील कामे मार्गी लावत अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांना हाणली टांग
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर झालेल्या सत्तानाट्यात पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही महिने होत नाही तोच आ. लंके यांनी पुन्हा माघारी फिरण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गेल्या दोन महिन्यात आ. लंके यांच्यासह त्यांच्या निवडक सहकार्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तब्बल चार बैठका केल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवार यांना पाठीबा देत सत्तेचा फायदा उठवण्यात आ. लंके यांना यश आले.
मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पाचशे कोटींपेक्षा जास्त निधी आणल्यानंतर आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आ. लंके यांनी शरद पवार यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पारनेरचे आ. लंके हे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजय औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विजयी झाले होते. महाविकास आघाडीची सत्ता असताना पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आ. नीलेश लंके शरद पवार यांच्या गोटात अजित पवार यांच्या गुडबुकमध्ये आ. लंके यांनी स्थान मिळवले. त्यातून मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले.शरद पवार यांनी लंके यांना विशेष ताकद देण्याचे काम केले. त्यातूनच आ. लंके यांचे कोणतेही काम कधीच आणि कोणत्याच पातळीवर अडकले नाही.आघाडीची सत्ता गेल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले.
मतदारसंघातील कामे त्यानंतर रखडली आणि जोडीने कार्यकर्त्यांचीही कामे मार्गी लागेनाशी झाली. दरम्यानच्या कालावधीत अजित पवार यांनी बंड केले आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. नगरमधून अजित पवार यांना साथ देणार्या आमदारांमध्ये सर्वात आधी नगरचे आ. संग्राम जगताप पुढे आले. दोन दिवस जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कोणत्याच आमदाराचे नाव पुढे आले नाही. मात्र, अजित पवार यांनी नगरमध्ये लक्ष घातले आणि नीलेश लंके, आशुतोष काळे व अकोल्याचे किरण लहामटे हे गळाला लागले.
शरद पवार यांची साथ सोडून आ. लंके जातील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी आपण अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आ. लंके त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळेच अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे आणि नवीन कामांसाठी निधी खेचून आणला. मात्र, याच कालावधीत त्यांनी भाजपा खासदार सुजय विखे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रसंगी विखे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना टार्गेट केले.
आ. लंके समर्थकही यात मागे नव्हते. राज्याच्या सत्तेत सहभागी असतानाही आ. लंके यांनी भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली. अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेताना दुसरीकडे त्यांनी शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्याशी सलगी कायम ठेवली. त्यामुळेच राष्ट्रवादीने बंडाळी केलेल्या आमदारांना नोटीसा पाठवल्या असताना ती नोटीस आ. लंके यांना पाठवली नाही. आयोगाकडे केलेल्या तक्रारीतही आ. लंके यांचे नाव शरद पवार गटाने टाकलेले नाही. याचाच अर्थ शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही आ. नीलेश लंके काय भूमिका घेणार हे माहिती होते.
आधी यांनी घेतली पवारांची भेट; नंतर स्वत: नीलेश लंकेच भेटले!
राष्ट्रवादीचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे व महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णाताई घाडगे या दोघांनी सर्वात आधी शरद पवार यांची भेट घेतली. सव्वातास या दोघांनीही नीलेश लंके यांची भूमिका मांडली. यानंतर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार-जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाबासाहेब तरटे यांनी थेट भूमिका मांडली आणि आ. लंके लोकसभा लढवणार असल्याचे सांगून टाकले. यानंतर मागील महिन्यात पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि दुसर्याच दिवशी आ. रोहित पवार यांच्या पदयात्रेत सहभाग नोंदवला. पक्षाच्या तालुक्यातील प्रमुखांना शरद पवार यांच्या भेटीसाठी पाठवणार्या आ. नीलेश लंके यांनी पाच दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. अत्यंत गुप्तता पाळून ही भेट झाली असली तरी त्याची माहिती समोर आलीच! या बैठकीत शरद पवार यांनी नीलेश लंके यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. यानंतर गेल्या पाच दिवसात आ. लंके भाजपच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसते. मराठा आरक्षणाचा मुद्दा, जिल्ह्यातील दुष्काळ आदी मुद्दे त्यांना आयते मिळाले आहेत.
राणीताई लंके असणार उमेदवार!
नगर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून म्हणजेच शरद पवार यांच्याकडून पहिल्यापासूनच दावा आहे. अजित पवार यांच्यासोबत राज्याच्या सत्तेत राहिल्यानंतर ही जागा भाजपकडेच राहणार हे वास्तव समजून घेतल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अजित पवार आपल्याला येथे उमेदवारी मिळवून देऊ शकणार नसल्याची खात्री आ. लंके यांची पटली. गेल्या चार वर्षांपासून लोकसभेचा ‘खटका’ डोक्यात असणार्या नीलेश लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दाखवत चतुर समजल्या जाणार्या फडणवीसांच्या डोळ्यात धुळफेक केली. आता कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच असा निर्धार त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्यातूनच जिल्हा परिषदेच्या सदस्य असणार्या नीलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांचे नाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून पुढे आले आहे. नवरात्र आणि दिपावलीच्या निमित्ताने सोशल मिडियातून त्यांच्या नावासमोर ‘भावी खासदार’ असा नामोल्लेख आतापासूनच सुरू झाला आहे.
अजित पवारांकडून भाजपचा विश्वासघात!
शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेणार्या अजित पवार यांनी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे दाखवून दिले. सत्तेचा फायदा उठवताना पदरात मनासारखे पडत नसल्याचे दिसताच रुसुन बसलेले अजित पवार सर्वांनी पाहिले. दिल्ली दरबारी सुत्रांची हालचाल झाल्यानंतर भाजपचे स्थानिक नेतृत्वही अजित पवारांसमोर झुकले. त्यातूनच अजित पवार यांनी आपल्याला पाठींबा देणार्या आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र, निधी पदरात पडलेले आमदारच आता भाजपच्या विरोधात भूमिका घेऊ लागल्याचे लपून राहिलेले नाही. अजित पवार यांनी हे सारे ठरवून केले आहे की आमदार त्यांची साथ सोडून जात आहेत हे पाहण्यासाठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.