अहमदनगर | नगर सह्याद्री
बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंत मनपाकडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालयासमोर दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. शहरातील व्यापारी, दुकानदारांचा आक्रोश मनपा आयुक्त, नगरसेवक, मनपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत काँग्रेस पोहोचविणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
काळे म्हणाले, आधीच कोणत्याही कारणावरून बाजारपेठ बंदची हाक वारंवार दिली जाते. समाज माध्यमांवर तसे संदेश फिरतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. व्यवसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार्यांनी बाजारपेठ, दुकाने बंद न ठेवू नयेत. व्यवसाय बंद ठेवून नुकसान करून घेऊ नये. आंदोलनस्थळी देखील व्यापार्यांनी गर्दी करू नये. त्यांनी आपले व्यवसाय सुरू ठेवत आंदोलनातील सहभाग कायम ठेवावा.
शनिवारी रात्री बाजारपेठेतील सप्तक सदन बँक्वेट हॉल येथे शहरातील विविध व्यापारी संघटना, असोसिएशनची संयुक्त बैठक झाली. यावेळी सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत शहर काँग्रेसने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.
बैठकीला काळे यांच्यासह एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, सचिव किरण व्होरा, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राजेंद्र बलदोटा, अहमदनगर होलसेल कापड असोसिएशनचे सचिव राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, इलेट्रिकल डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे वसंत शहा, मनोहर शहाणे, उमेश रेखे, ऑप्टिकल्स असोसिएशनचे सागर मुळे, नयन आडकर, फुटवेअर असोसिएशनचे नेमीचंद गोयल, होलसेल मेडिकल असोसिएशनचे अशोक बलदोटा, सराफ बाजार असोसिएशनचे पांडुरंग दहिवाळ, सुभाष कायगावकर, वैजनाथ चिंतामणी, मोहन देवळालीकर, शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मोची गल्ली मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिस चुडीवाला, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक उपाध्यक्ष आनंद जवंजाळ, नंदलाल दोडगे, धीरज मुनोत, राहुल मुथा, पेमराज पोखरण, पंडित मिसाळ, रवी वाळवेकर, सुरेश गांधी, किशोर ताथेड, सतीश मुथा, विशाल वैद्य, आनंद नहाटा, विजय मुनोत, लक्ष्मीकांत तिवारी आदी उपस्थित होते. सावेडी, केडगाव उपनगरातील दुकानदारही सहभागी झाले होते.
काळे म्हणाले, शासन शॉप अॅट लायसन शुल्क अनेक वर्षांपासून घेत आहे. व्यावसायिक ते जमा करत असल्याने पुन्हा त्याच कारणासाठी व्यावसायिक परवा शुल्क का द्यायचे? मनपा महासभेत नगरसेवकांनी आवाज उठवायला हवा होता. त्यावेळी ते शांत बसले. मात्र आता काही लोक पत्रकबाजी करुन अकलेचे तारे तोडत आहेत. दिवंगत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांचा व्यापार्यांना मोठा आधार वाटायचा. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. ते नसले तरी त्यांचा वारसा, विचार डोळ्यासमोर ठेवून शहरात काँग्रेस व्यापारी, दुकानदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. व्यापार्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे यावेळी काळे म्हणाले.