मुंबई : नगर सह्याद्री
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार झाले. मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊनही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडच्या जागेवर मात्र भाजपला पराभव स्विकारावा लागला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलंय. नांदेडमध्ये काँग्रेसचा झालेला विजय, लोकांचं मत यावर वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. अशोक चव्हाणांना वर्षा गायकवाड यांनी काय संदेश दिला ?
मला अशोकराव चव्हाण यांना काही संदेश द्यायचा नाही. आमच्याकडची पण खूप मंडळी गेली मुंबईमधील लोक पण पक्ष सोडून गेली आहेत. मी सर्वांना सांगितलं की, नांदा सौख्यभरे… जिथे आहात तिथेच पूर्णपणे राहा. सुखी राहा हीच मी या ठिकाणी अपेक्षा करते. मी पक्षाकडे विनंती करतो की जे गेले त्यांना जाऊ द्यावं. नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वसंतराव चव्हाण यांना निवडून दिल्याबद्दल नांदेडच्या जनतेचे धन्यवाद मानायचे आहेत. माझे वडील सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रचारासाठी नांदेडला यायचे माझे ऋणानुबंध आहेत. हिंगोलीची पालकमंत्री म्हणून काम केले आहे तर परभणीचे संपर्क मंत्री म्हणून काम केलंय. मराठवाड्याशी माझा संपर्क आहे. हिंगोलीमध्ये काँग्रेसचा स्ट्रॉंग बेस आहे. पूर्वी राजीवभाऊ होते. दुर्दैवाने त्यांच्या जाण्याने पक्षाचे नक्कीच नुकसान झालं आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
अशोक चव्हाण भाजप गेल्याने भाजपाला फायदा झाला की तोटा झाला याचा आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावा. जनतेने ठरवलं होतं जे स्वार्थासाठी गेले. जे सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली गेले. जे पैशाच्या अमिषा पोटी गेले त्यांना यावेळी घरी बसवायचं. दुर्दैवाने लोकांना असं वाटायला लागलं की, आम्ही जे सांगू जनता येथे मतदान करेल. आम्ही जिकडे जाऊ. तिकडे जनता मतदान करेल असं नाहीये, असंही वर्षा गायकवाडांनी म्हटलं आहे.