नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच!
मोरया रे / शिवाजी शिर्के –
बाप्पाला सार्यांनीच निरोप दिला. मात्र, जाताजाता त्याने मला दिपावलीच्या लक्ष्मीपुजनापर्यंत मुक्काम ठोकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार तो शब्द पाळणार की नाही याची उत्सुकता कायम होती. सकाळी चितळेरस्त्याने येत असतानाच नेता सुभाष चौकाच्या अलिकडे वाचनालयासमोरच्या टपरीवर बाप्पा दिसला!
मी- (मोठ्याने आवाज दिला) बाप्पा, गेला नाहीस का! इथे काय करतोस?
श्रीगणेशा- तुला शब्द दिलाय आणि शब्द दिल्यानुसार तो मी पाळतो! या चौकात काल खुपच जोरदार शक्तीप्रदर्शन झालं. निमित्त माझ्या निरोपाच्या मिरवणुकीचं होतं आणि शक्तीप्रदर्शन विधानसभा डोक्यात ठेवून होतं. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यासाठी तुमच्या पोलिस अधीक्षकांसह त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीचं कौतुकच! पण, आमदारकी डोक्यात ठेवून ज्यांनी- ज्यांनी अटापीटा केला, त्या सार्यांनाच घाम फोडला तो संदीप कोतकर या पठ्याने! स्वत: मिरवणुकीत नव्हता, पण समर्थक असे उतरवले होते की सार्यांचीच हवा टाईट केली त्यानं. एका जुन्या केसमध्ये अडकल्यानंतर न्यायालयीन लढाईनंतर संदीप कोतकर याने सोशल मिडियावर टाकलेला व्हीडोओ आणि त्यात शेवटच्या चार सेकेंदात मांडलेली भूमिका बरंच काही सांगून गेली. ‘स्पंदन’ची मिरवणूक नगर शहराला नवी व वेगळी दिशा देणारी ठरणार, या वाक्यात बरंच काही आलंय! आदल्या दिवशी कार्यकर्त्यांची झालेली बैठक, त्या बैठकीतील नियोजन आणि त्याआधी पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर करण्यात आलेले कँपेनींग पाहता संदीप कोतकर हे स्वत: नगर शहरात लक्ष घालून असल्याचे लपून राहिलेले नाही. जयंत पाटलांच्या माध्यमातून थेट शरद पवारांसोबत बैठकांचा सीलसीला त्यांनी केला. त्यातून सकारात्मक सिग्नल मिळताच संदीप कोतकर हे सक्रिय झाल्याचे लपून राहिले नाही.
मी- बाप्पा, मला नाही वाटत असं होईल! जगताप- कोतकर या दोघांचेही सासरे असणारे शिवाजीराव कर्डिले हे यातून मार्ग काढतील आणि दोन्ही जावयांची समजूतही काढतील! त्यांच्या आपसातील मामला आहे हा! तू कशाला त्यात तेल ओतायचं काम करतोय!
श्रीगणेशा- (मोठ्यांदा हसला) तेल ओतण्याचे आणि आग लावून गंमत पाहण्याचे काम तुम्हा पत्रकार मंडळींना जमते! वास्तवात जे काही घडतंय आणि घडणार आहे याची जाणिव मी करुन देत आहे.
मी- बाप्पा, लांडे प्रकरणात ज्यावेळी कोतकर कुटुंबाला कायदेशिर कारवाईस सामोरे जावे लागले त्यावेळी चार-पाच वर्ष वय असणारी लेकरं आज मतदार झालेत! त्यांना संदीप कोतकर व त्यांचे काम याची पुसटशी देखील कल्पना नाही. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय रे!
श्रीगणेशा- पुलाखालून कितीही पाणी वाहून जाऊ देत! मात्र, यावेळी कोतकरांनी लढायचं ठरवलंय हे नक्की! पवारांची तुतारी चिन्हही त्यांंनी अंतिम केलंय! हे खरं आहे की, तुतारी मिळणार म्हणजे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असणार! आघाडीतील शिवसेनेची यातून मोठी गोची होऊ शकते. कारण, नगरच्या शिवसेनेचा आधी संघर्ष उडाला तो कोतकरांशी! कोतकर आत गेल्यानंतर जगताप यांच्याशी शिवसेनेचा संघर्ष झाला. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे. मात्र, तसेही शिवसेनेकडून ताकदीचा उमेदवार कोण याचे उत्तर तुझ्याकडे आहे का? (बाप्पाच्या या प्रश्नावर मी बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच बाप्पानं मला खुणेनेच थांबवलं!) थांब, दोन दिवस विचार करून उत्तर दे! फक्त उत्तर देताना अशी दोन नाव सांग की, जे रात्रीच्याला सेटेलमेंट करत आलेले नाहीत! अरे काही जण दिवसा विरोधात बोलताना दिसतात आणि रात्री त्यांच्याच्या विरोधात आयुर्वेदमध्ये जाऊन मांडीला मांडी लावून सेटेलमेंट करत असल्याच्या चर्चा आहेत. यातील काही नावे जगजाहीर आहेत. जातीचं कार्ड खेळलं जावं असं काहींना वाटतं! मात्र, त्यातही काहीच अर्थ वाटत नाही. ‘इलेक्टींग मेरीट’ चा विचार केला तर नगरची जागा शिवसेना सोडून देणार हे नक्की! राज्यात सत्तेत यायचे असेल तर हेच मेरीट तीनही प्रमुख राजकीय पक्षांकडून विचारात घेतले जाणार आणि त्याचा विचार करता नगरची जागा शिवसेनेसाठी इलेक्टींग मेरीटची वाटत नाही. याशिवाय मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्यानुसार राष्ट्रवादीच येथे दावा करणार! शिवसेना येथे दावा करेलही! मात्र, ताणून न धरता त्या बदल्यात श्रीगोंद्याची जागा काढून घेणार! पारनेरबाबतही तेच आहे. पारनेरमध्ये इलेक्टींग मेरीटचा विचार केला तर येथे राणीताई लंके यांच्याशिवाय महाविकास आघाडीकडे पर्याय दिसून येत नाही. पारनेरमध्ये विरोधात कोण असं विचारणार असशील तर ही संख्या आजच एक डझनपेक्षा जास्त नावांची! त्यावर न बोललेलं बर! नगर जिल्ह्यात शिवसेनेला मिळू शकणारी एकमेव जागा म्हणजे श्रीगोंदा! त्यानुसार साजन हाच श्रीगोंद्यातील उमेदवार असणार हे स्वत: संजय राऊत यांनी जाहीर केलंय आणि आदित्य ठाकरे यांनी श्रीगोंद्यातील जाहीर सभेत त्याचीच री ओढली! याचाच अर्थ पारनेरसह नगर शहराचा दावा सेनेने सोडलाय!
मी- बाप्पा, म्हणजे नगर शहर आणि श्रीगोंद्यात घरातच लढाई होणार का रे?
श्रीगणेशा- तू तसेच समज आता! नगर शहरात कधीकाळी जगताप विरुद्ध कोतकर हा संघर्ष मोठा होता! या दोघांच्या समर्थकांमध्ये अनेकदा हाणामार्या झाल्या होत्या! मात्र, सोयरीकीने दोघे एकत्र आले. कोतकरांची मुलगी जगतापांच्या घरात आली! त्यानंतर कर्डिलेंची मोठी कन्या सुवर्णा कोतकरांच्या घरात आणि लहान मुलगी शितल ही जगतापांच्या घरात! त्यातूनच नगरच्या राजकारणात कर्डिले- कोतकर- जगताप यांचा दबदबा निर्माण झाला आणि कोतकर- जगताप यांच्यातील संघर्षही संपला! खरंतर जगताप यांचा नगर शहर हा बालेकिल्ला! त्याआधी शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्यात नगर तालुक्याच्या वर्चस्वावरुन मोठा संघर्ष राहिला! दोघांच्यातून त्यावेळी विस्तव देखील जात नव्हता! मात्र, सोयरीक झाली आणि सारेच बदलले! त्यानंतर कर्डिले-जगताप व्याही-व्याही झाले. कधीकाळी जगताप आणि कोतकर यांच्यात देखील मोठा संघर्ष होता. संदीप कोतकर महापौर असताना जगताप यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. त्यातूनच संग्राम जगताप यांनी त्यावेळी गळ्यात शिवसेनचं धनुष्यबाण अडकवलं होतं. कोतकर- जगताप यांच्यातील वर्चस्वाची लढाई यावेळी निर्णायक वळणावर आली हे मात्र नक्की! त्यात शिवाजीराव कर्डिले हे काय भूमिका घेतात हेही पहावं लागणार आहे. अरेबाबा, श्रीगोंद्यात पाचपुते कुटुंबातच संघर्ष उभा राहणार आहे. साजनची उमेदवारी नक्की मानली जात आहे. त्याच्या विरोधात पाचपुते कुुटुंबाकडून सध्या तरी प्रतिभाताई आणि विकीदादा यापैकी कोण याचा फैसला अद्याप झालेला नाही!
मी- प्रतापचं नाव देखील चर्चेत आलं आहे बाप्पा! मात्र, असं असलं तरी विकीदादाच अंतिम असेल बाप्पा!
श्रीगणेशा- काय नाचला तुझा विकीदादा काल! माझ्या निरोपाच्या मिरवणुकीत तुझा विकी दादा, ‘बघ… बघ ये सखे कसं गुबू- गुबू वाजतंय’ या गाण्यावर बेधूंद होऊन नाचला! आपला मोठेपणा, बडेजाव सोडून हे असं विकीदादानं निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांमध्ये सहभागी न होता कायम सहभागी व्हावं! हेच श्रीगोंदेकरांना अपेक्षीत आहे. प्रताप बद्दल बोलणार आहेच. अवधूत राऊतची दहा- बारा ओळींची ‘आपण आपलं काम चालू ठेवायचं’, ही चारो़ळी सार्यांनाच भावली बरं! मला देखील भावली! त्यावरही बोलणार आहेच मी! चितळेरोडवरील या चौकात (नेता सुभाष चौकात) का थांबलो होतो हेही सांगणार आहेच! यावेळी माझा उत्सव धार्मिक न राहता राजकीय आखाडा झाला! भल्याभल्यांना दुचाकीवर फेरफटका मारावा लागला! बोलणार आहेच मी त्यावरही! तूर्तास निघतोय! पुन्हा भेटूच, असं म्हणून बाप्पानं माझा निरोप घेतला आणि मीही त्याचा!
बाप्पाने उपस्थित केलेले दोन प्रश्न?
१) समजा माझी मुर्ती फोडली तर ती फोडणारे परधर्मीय म्हणून कांगावा करता! मग, माझ्या समोर हिडीस, अश्लिल गाणी लावून नाचणारे तुम्ही हिंदू! या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण?
२) डीजे-लेसर लाईटसवर बंदी न घालणार्या प्रशासनाने मिरवणुकीनंतर ही यंत्रणा ताब्यात घेतली आणि संबंधीतांवर गुन्हे दाखल केले! पण, हेच काम मिरवणुकीत सहभागी होण्याआधी का झाले नाही?