पारनेर | नगर सह्याद्री:-
श्री गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. गोरेश्वर या संस्थेमधील ठेवी सहा सात महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवार ११ ऑगस्ट रोजी गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या विरोधात एल्गार रॅलीचे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पतसंस्थेतील खातेदार – ठेवीदार यांच्या सेव्हिंग तसेच ठेवीवरील रकमा व्याजासह तात्काळ मिळाव्यात. पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करुन संबंधितावर फसवणुकीसह फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
संबंधितांना दिलेल्या निवेदनांची चौकशी करुन कारवाई करावी. पतसंस्थेतील सदस्याचा कारभार पारदर्शी होण्यासाठी दरमहा लेखा जोखा खातेदारांच्या माहितीसाठी फलकावर सादर करावा. सेव्हिग्ज रकमा वाटप करण्याचे निश्चित धोरण जाहीर करावे अशा खातेदार ठेवीदारांच्या मागण्या आहेत.
११ ऑगस्ट रोजी गोरेगाव येथे पतसंस्थेविरोधा निदर्शने तसेच गावातून मोर्चा फेरी काढून खातेदार ठेवीदार यांच्या हक्कासाठी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून पारनेर पोलिस स्टेशन येथे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहारमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक यांना खातेदार-ठेवीदारांनी निवेदन दिले आहे. निवेदनावर ११४ खातेदार, ठेवीदारांच्या सह्या आहेत.