spot_img
अहमदनगरश्रीगोंद्यात चर्चा झडतेय धृतराष्ट्रांच्या टोळीची!

श्रीगोंद्यात चर्चा झडतेय धृतराष्ट्रांच्या टोळीची!

spot_img

‌‘सवत रंडकी‌’ करण्याच्या मानसिकतेची तिरकी चाल कोण खेळतंय हे धृतराष्ट्रांनी ओळखण्याची गरज
सारीपाट / शिवाजी शिर्के
श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या कुटुंबातून विक्रम पाचपुते यांची उमेदवारी निश्चित झालीय. उमेदवारी अंतिम असल्याचे आधीच नक्की झाल्याने त्यांनी मतदाररसंघाचा जवळपास तिसरा राऊंड पूर्ण केलाय. पाचपुते यांच्या विरोधात माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारीही नक्की झाल्यात जमा आहे. राहुल जगताप यांची उमेदवारी अंतिम झालेली असताना त्यांची उमेदवारी कापण्यासाठी तिसऱ्या भिडूने चाली खेळण्यास प्रारंभ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी तालुक्यातील इच्छुक असणाऱ्या धृतराष्ट्रांची टोळीला गळाला लावल्याची चर्चा झडत आहे. अर्थात गळ टाकण्याच्या या प्रयत्नात स्वत:चीच विकेट गमवावी लागली तर आश्चर्य वाटू नये!

विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे आजारी आहेत. भाजपाकडून त्यांच्याच घरात उमेदवार अंतिम करण्यात आला आहे. विक्रम पाचपुते यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली आणि नक्की काय चालले आहे याचा गाजावाजा न करता मतदारसंघावर आपली पकड निर्माण केली. गणेशोत्सवाच्या आधी घेतलेला मेळावा, त्याचे नियोजन आणि गणेशोत्सव मंडळांसह नवरात्रौत्सव मंडळांना थेट भेट देण्याचे कामही त्यांनी केले. याच दरम्यान महाविकास आघाडीकडून राहुल जगताप यांची उमेदवारी नक्की असल्याचे संकेत मिळाले. शरद पवार यांच्यासह पक्षाच्या जिल्हा आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राहुल जगताप यांना उमेदवारीचे संकेत दिले. उमेदवारी अंतिम होताच राहुल जगताप यांनी पाचपुतेंसारखीच संयमी भूमिका घेतली. कोण काय बोलतो आणि कोणाला भेटतोय याबाबत फारसे जाहीर न बोलता प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आणि मतदारसंघात यंत्रणा सक्रिय करणे यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येते.

पाचपुते- जगताप हे दोघेही सक्रिय झाले असताना एकाही राजकीय पक्षात अथवा नेत्याशी एकनिष्ठ न राहिलेल्यांनी त्यांच्या हालचाली सुरू केल्या. महायुतीत अजित पवार गटात असणाऱ्या नागवडे यांना यावेळी अजित पवार यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र, भाजपाने ही जागा सोडणार नसल्याची भूमिका घेतली आणि त्यात अजित पवार यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे आपसुकच नागवडे यांच्या मविआतील उमेदवारीचा विषय संपला. अजितदादांनी शब्द दिलाय आणि तो ते पाळतील असा विश्वास नागवडे यांना होता. मात्र, उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या तरी अजितदादांकडून श्रीगोंद्याबाबत काहीच निरोप नागवडे यांना मिळाला नाही. अजित पवार यांच्या सांगाव्याची वाट न पाहता नागवडे यांनी आपण लढणार आणि प्रसंगी अपक्ष लढणार अशी भूमिका घेतली. त्याचवेळी त्यांनी तुतारी, पंजा आणि मशाल या तीनही चिन्हांची चाचपणी केली आणि त्या-त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास प्रारंभ केला. लढायचं असलं तरी कोणत्या पक्षाकडून हे अद्यापही स्पष्टपणे समोर आलेले नाही.

महाविकास आघाडीची उमेदवारी जगताप यांना अंतिम झालेली असतानाही अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, साजन पाचपुते यांनी उमेदवारीसाठी कसलेली कंबर आजही कायम आहे. उमेदवारी मिळू शकते, असा आशावाद त्यांना दिला जात आहे. मात्र, राहुल जगताप यांच्याबाबत महाविकास आघाडीत भूमिका स्पष्ट झाली आहे. अण्णासाहेब शेलार यांची राजकीय भूमिका ही कायम व्यक्तीपरत्वे बदलत आली आहे. राजकीय पक्षापेक्षाही त्यांनी कायम व्यक्तीपुजा केली. 2012 पासून राहुल जगताप यांच्या गळ्यातील ताईत राहिलेल्या अण्णासाहेब शेलार यांची आजची भूमिका शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागण्याची झालीय! नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आणि सुजय विखे यांच्यासाठी प्रचार केला. आता त्यांनी शरद पवार यांना भेटून त्यांच्या पक्षाची उमेदवारी मागितली आहे. त्याच्या आधी त्यांनी अर्धाडझन राजकीय पक्षांकडे हीच मागणी केली.

आता शेवटी शरद पवार यांच्याकडे ते मागणी करत असले तरी त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे लपून राहिलेले नाही. भाजपाकडून विक्रम पाचपुते यांची उमेदवारी कायम झाली असताना सुवर्णा पाचपुते यांनी देखील उमेदवारी आपलीच असल्याचे सांगण्यास प्रारंभ केलाय. त्या भाजपाच्या निष्ठावान आहेत. त्यांचीच उमेदवारी भाजपाकडून अंतिम झाल्याची चर्चा सोशल मिडियात आहे. त्यांचे हे असे अचानक सक्रिय होणे म्हणजेच पडद्याआड काहीतरी शिजतंय आणि त्यात कोणीतरी भूमिका बजावतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असताना ठाकरे गटाने येथे जोर का धरलाय? साजन पाचपुते यांच्यासाठी ही जागा मागितली जात असली तरी साजन यांची राजकीय ताकद किती? ‌‘सदाअण्णांचा मुलगा‌’ हीच काय ती त्याची ओळख! काष्टीत सरपंच म्हणून काम करत असले तरी त्यांच्याबाबत काष्टीकरांमध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे याचीही नोंद घेण्याची गरज आहे. दोन वर्षापूव श्रीगोंदा कारखान्याच्या निवडणुकीत जाहीरपणे सार्वत्रिक निवडणुकीतून निवृत्त होण्याची घोषणा करणारे बाबासाहेब भोस गेल्या चार दिवसात उमेदवारीची भाषा कशीकाय करू लागले? भोस यांना कोणीतरी मधाचे बोट लावले असल्याची चर्चा देखील थांबायला तयार नाही. श्रीनिवास नाईक हे त्यातीलच एक नाव!

राजेंद्र नागवडे हे अजित पवार गटात असतानाही शरद पवारांना भेटतात. लागलीच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची पुण्यात भेट घेतात याचा अर्थ काय काढला जाणार? सोबत बाबासाहेब भोस यांनाही त्यांनी घेतले. संजय राऊत यांचीही नागवडे यांनी भेट घेतल्याचे बोलले जाते. अजित पवार यांच्या पक्षाला राम राम न करता लागलीच दुसरा पर्याय शोधणाऱ्या नागवडे यांचा निष्ठा नक्की कोणाजवळ आहेत असा प्रश्न यानिमित्ताने श्रीगोंदेकर उपस्थित करत आहेत. पाचपुते यांच्या विरोधात जगताप यांची उमेदवारी अंतिम आहे. मात्र, जगताप यांना उमेदवारी टाळून धृतराष्ट्रांच्या टोळीतील कोणाही एकाला दिल्यास आम्ही मविआसोबत राहू हे दाखविण्याचा हा केविलावाणा प्रयत्न असणार आहे. राहुल जगताप हे आमदार असताना आणि नसतानाही शरद पवार यांच्यासोबत राहिले. राष्ट्रवादीतील बंडाळीत अजित पवार यांच्याकडून मोठी ऑफर असतानाही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. त्याचीच पावती त्यांना आता उमेदवारीतून मिळणार आहे.

त्यामुळे लढण्याची भाषा करणाऱ्या अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार,बाबासाहेब भोस यांना त्यांचा नेहमीप्रमाणे वापर होऊ द्यायचा की नाही हे ठरवावे लागणार आहे. तसेही तालुक्यातील जनतेने कोण काय चाल खेळतोय हे ओळखले आहे. त्यामुळे झाकली मुठ…. लाखाची की फुकाची….; याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. पाचपुते- जगताप यांच्याशिवाय उमेदवारी करण्यास सज्ज झालेल्या अनुराधा नागवडे यांच्याबद्दल सहानुभूती असली तरी राजेंद्र नागवडे यांच्याबद्दलची नाराजी, त्यांचा तिरसट स्वभाव, वाड्यावरचं घमेंडी स्टाईलचं राजकारण याचा तोटा अनुराधा नागवडे यांना होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...