Ahmednagar Crime:श्रीगोंदा तालुयातील भिमानदी काठावरील अजनुज येथील जलजीवन पाणी योजणेची चौकशी तुम्ही का लावली म्हणून माजी सैनिकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माजी सैनिक नितिन गोरख गिरमकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गावचे सरपंच पती योगेश रामदास गिरमकर, राजेंद्र बापुराव गिरमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजनुज गावातील जनतेसाठी जलजीवन मिशनची २ कोटी ६ लाखाची पाणी योजना मंजुर झाली आहे. योजना राबविण्यासाठी निधी शासनाकडून मिळाला आहे. मात्र ठेकेदाराने योजनेचे फक्त वीस टक्के काम करुण पंचावन्न टक्के काम दाखवत २ कोटी ६ लाख पैकी १ कोटी ११ लाखाचे बोगस बीले काढल्यामुळे योजनेची चौकशी व्हावी यासाठी अजनुज येथील ग्रामस्थांनी उपोषण केले होते. सदर योजनेची चौकशी लागली असताना दि.२६ रोजी दुपारी दोन वाजता अजनुज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे जुनिअर अभियंता पाचनकर याच्या समोर ग्रामस्थांची बैठक सुरु होती.
दरम्यान राजेंद्र गिरमकर तसेच सरपंच पती योगेश गिरमकर यांनी बैठकीत शाब्दिक बाचाबाची करुण योजनेत काही निष्पन्न होणार असल्याचे सांगितले. तुम्ही चर्चा व चौकशी करु नका असे म्हणत ठेकेदाराची पाठराखण केली. त्यावेळी योजनेच्या कामाची नितिन गिरमकर हे अधिकारी यांच्याकडे चौकशी करित असताना सरपंच पती योगेश गिरमकर व राजेंद्र गिरमकर यांनी बैठकीतच शिविगाळ करुण नितिन गिरमकर यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
‘तो’ जबाबदार नेता पहातच राहिला ?
अजनुज जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या चौकशीसाठी अधिकारी व स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु असताना अचानक शिविगाळ सुरु होवून हाणामारी सुरु असताना तालुक्यातील भावी आमदार तेथे उपस्थित असताना त्यांनी भांडण सोडवण्याऐवजी टेबलवर उभे राहून पाहाण्याची भूमिका का घेतली? असे नेते तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाले तर सामान्य जनतेला न्याय देतील का? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपिस्थत करत नेत्यावर नाराजी व्यक्त केली.