अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील राजकारण व त्यावर विखे यांचे असणारे प्रभुत्व ही गोष्ट सर्वश्रुत. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे व आ. बाळासाहेब थोरात यांचे राजकीय शत्रुत्व देखील सर्वपरिचित आहे. आता आ. थोरातांनी मंत्री विखे यांचे नाव घेता मोठा गौप्यस्फोट केला आहे.
थोरात विखे यांचे नाव न घेता म्हणाले, तुम्ही संगमनेर तालुक्यात दहशत माजविण्याकरिता आणि विकास मोडण्याकरिता येता ही वस्तुस्थिती आहे. कुणाला वेगळं वाटत असेल तर जरुर चर्चेला बसण्याची आमची तयारी आहे. कुणावरही खोट्या केसेस दाखल करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, त्यांना जेलमध्ये घालायचे हे सगळे उद्योग सुरु असून आम्ही पुरून उरणारे आहोत, असा घणाघात केला आहे.
वडगाव पान येथे कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रम संयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, दुर्गाताई तांबे, शंकरराव खेमनर आदींसह अनेक लोक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रत्येक गावात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचा कलश करून त्याचे पूजन करण्यात आले.
आ. थोरातांनी मोठा घणाघात यावेळी केला. ते म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळग्रस्तांना मिळावे, असे स्वप्न घेऊन आम्ही काम केले. पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा उदघाटन झले तेव्हा यात हातभार लावणारे,
योगदान देणारे तसेच प्रकल्पग्रस्त किंवा सामान्य कामगारही उपस्थित नव्हते, ही चांगली बाब नाही. ज्यांनी योगदान दिले तेच तेथे नव्हते. आणि जे योगदान देत नाहीत ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांना सगळं माहीत आहे. आता डाव्या कालव्यातून पाणी वाहू लागले आहे. मात्र, अनेक गावे वंचित राहत आहेत असेही ते म्हणाले.