अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.
काल मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत, नीलेश लंके यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे.
माजी खासदार सुजय विखे यांनी अॅड. आश्विन होन यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत काही मतदान केंद्रांवरील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नसल्याचा दावा आहे. निवडणूक आयोगाकडे फेरपडताळणीची मागणी केली आहे.
तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नीलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी असल्याचा आरोप आहे. नीलेश लंके यांनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नाही.
मुद्रित प्रचार साहित्याचा खर्च दाखवलेला नाही. त्यामुळे लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.