छत्रपती संभाजीनगर | नगर सहयाद्री
मराठा आरक्षणासाठी सरकार राज्यभर काम करत आहे, सरकारचे काम जोरात सुरू आहे. जे आमचे आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही’, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर आरक्षण विरोधी नेत्यांची नावे जाहीर करू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे आरक्षण द्यावे लागेल. पुरावे आहेत तर दाखले मिळावेत हीच गावातील ओबीसींचीही भावना आहे. मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे. आमच्या नोकर्या आम्हाला मिळाव्यात, ज्यांनी आमच्या नोकर्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवे. आम्हाला आमच्या हक्काचं मिळायला हवे, २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू.
ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजेत. ओबीसींना शिक्षण आणि नोकर्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळाले पाहिजे. पुरावे असतानाही ४० वर्षे मराठा समाजाचे वाटोळे झाले. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. नेत्यांमुळेच मराठा समाजाचे नुकसान झाल्याचेही जरांगे यावेळी म्हणाले.
मागच्या दाराने यायचे अन आरक्षण घ्यायचे:भुजबळ
एका बाजूने मागच्या दाराने ज्यांना आरक्षण देऊ शकत नाही अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे, ओबीसीमध्ये यायचे आणि दुसर्या बाजूने ओबीसीमध्ये जे आहेत त्यांना कोर्टात लढून ओबीसी बाहेर ढकलायचे असा दुहेरी कार्यक्रम सुरु आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, कायदेशीर लढाई, बाहेरची लढाई सुरु आहे. मनोज जरांगे पाटील जे सांगतात त्याचा अर्थ तोच होतो. त्यांना सर्व प्रकाराचे आरक्षण हवे आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे हवे आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र दिले की बाकीच्यांना द्यावे लागणार. सगळे कुणबी झाले की ओबीसीतले त्यांना अधिकार मिळावेत. शिक्षण, नोकरी, राजकीय असे अधिकार त्यात आहेत. ३७५ जाती आहेत त्यात जर ही सगळी मंडळी आली तर कुणालाच काही मिळणार नाही. ओबीसी तर संपूनच जाणार, असेही भुजबळ म्हणाले.