अहमदनगर | नगर सह्याद्री
गावठी कट्ट्यांचा वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाईल, गावठी कट्टे बहुतांश मध्य प्रदेशातून येतात. महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील जिल्ह्यांच्या बैठकीत याबाबत आढावा घेतला जाईल, असे नाशिक परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच नगरला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश्वर ढिकले उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची सूचना केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी आपण नगर व संगमनेरमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले असल्याने आपल्याला जिल्हा परिचित आहे. त्याचा उपयोग काम करताना होईल.
जिल्ह्याची लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण, भौगोलिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्रांची मोठी संख्या लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस संख्याबळ ५०० ने वाढवावे यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. याबरोबर ८ नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पूर्वीच पाठवला आहे. कोपरगाव, पाथर्डी, श्रीरामपूर येथील पोलीस वासाहतींचे प्रस्ताव मार्गी लागले आहेत. जिल्हा पोलीस दलातील ’सीसीटीएनएस’ प्रणाली अद्ययावत केली जात आहे. त्याचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सध्याची प्रणाली कालबाह्य झाली आहे. त्याच्यामुळे त्याचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.