संगमनेर। नगर सहयाद्री-
महायुती सरकारने सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा मोठा दिलासा तालुक्यातील शेतक-यांना मिळाला असून, यावर्षी या विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे ४४ हजार ५४७ शेतकरी लाभार्थ्यांना अग्रीम रक्कमेपोटी सुमारे २५ कोटी ६५ लाख रुपये मंजुर झाले असल्याची माहीती महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना शेतक-यांसाठी सुरु केली होती. अशा पध्दतीची योजना सुरु करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव ठरले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नगर जिल्ह्यातही सुमारे साडे अकरा लाख शेतक-यांनी या योजनेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
संगमनेर तालुक्यात २०२३ मध्ये सुरु झालेल्या पीकविमा योजनेत एकुण ८४ हजार ९२६ शेतक-यांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी ४४ हजार ५४७ लाभार्थ्यांना २५ कोटी ६५ लाख ६२ हजार रुपयांची अग्रीम रक्कम मंजुर झाली असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
यापुर्वी सुरु असलेल्या पीकविमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाल्याने कंपन्याकडून पीकविम्याचा कोणताही लाभ शेतक-यांना होवू शकला नाही. राज्यात युती सरकार आल्यानंतर शेतक-यांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येवू न देता राज्य सरकारनेच एक रुपयात पीकविमा योजनेची अंमलबजावणी स्वत:हून केली.
यापुर्वी संगमनेर तालुक्यात २०२२ सालच्या योजनेमध्ये अवघे ५ हजार २२५ शेतकरी सहभागी झाले होते. त्यांना केवळ १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांच्या पिक विम्याचा लाभ मिळू शकता. आता राज्य सरकारनेच योजना सुरु केल्यामुळे ४४ हजार ५४७ शेतकरी या योजनेत सहभागी होवू शकले हे या योजनेचे वैशिष्ट्य ठरले असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.