अहमदनगर / नगरसह्याद्री : माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समिती खासगी बाजाराच्या धर्तीवर मुंबई एपीएमसीसह पाच बाजार समित्यांचा अभ्यास करणार आहे. या समितीत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश केला आहे. ही समिती येत्या महिनाभरात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव भेटण्यास मदत होईल.
व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सहकार विभागाने थेट विपणन व खाजगी बाजार आवारांसह कंत्राटी शेती व इलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. हे समोर आल्यावर सहकार विभागाने १३ सप्टेंबर २०२३ रोजी एक समिती स्थापन केली होती.
राज्यातील पाच बाजार समित्यांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बाजार समित्या, खासगी व कंत्राटी बाजार व्यवस्थेतील यंत्रणा, शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या महिनाभरात अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितलं आहे.
माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 75 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीत पणन सचिव, संचालकांसह औरंगाबाद, नाशिक, विदर्भातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापार्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दांगट यांची समिती मुंबई एपीएमसीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या बाजार समित्यांचा अभ्यास करणार आहे. येत्या महिनाभरात हा अभ्यास पूर्ण होवून राज्य सरकारला आपला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.