पंढरपूर । नगर सहयाद्री:-
विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मंदिर समितीने भक्तनिवासांमध्ये राहणाऱ्या भाविकांसाठी अल्पदरात नाश्ता आणि भोजन उपलब्ध करून दिले आहे. मंदिर समितीने हॉटेल स्वतः ताब्यात घेतले आहे, कारण जास्त दरांमुळे भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने उभारलेल्या विविध भक्तनिवासांमध्ये राहण्याची सोय केली आहे. या भक्तनिवासांमध्ये 364 खोल्यांमध्ये रोज जवळपास 1500 भाविक निवास करू शकतात. या भक्तनिवासांमध्ये चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी हॉटेलचा ठेका दिला होता, परंतु जास्त दरांमुळे तक्रारी आल्यामुळे मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री बंद करण्यासाठी, कालपासून अल्पदरात चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड या सर्व सुविधांकडे लक्ष ठेवत आहेत.
यासाठी चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे, आणि जेवणाची थाळी फक्त 100 रुपयात उपलब्ध आहे. त्यामुळे भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री बंद होणार आहे. या भक्तनिवासांमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखांपेक्षा जास्त भाविक येतात, आणि आता त्यांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अल्पदरात मिळणार आहेत.