मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली असून कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खाते आणि प्रशासनाने दिला आहे.