अहमदनगर / नगर सह्याद्री-
मागील दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. नगर शहरासह नगर तालुक्यात जेऊर परिसरात दमदार पाऊस झाल्याने नगर कल्याण रोड वरील सीना नदीचा पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पावसाळ्यातील सीना नदीला आलेला पहिलाच पूर असल्याने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने आपले रूद्र रूप धारण केले. अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून, गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद नगर शहर व परिसरात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सीना नदीला पूर आला असून वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
सीना नदीला आलेल्या चार तासाच्या पुराने शाळेत जाणारे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे कामगार, येणारे जाणारे प्रवासी यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच परिसरात असलेले विजेचे काम देखील कोसळले आहे.