अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात दोन दिवसांपासून रिमझिम तर काही भागात संततधार सुरु आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या भीज पावसाने खरिप हंगामतील पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. खरीप पिके तरारली आहेत. भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी जिल्ह्यात सरासरी २४.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ७८ टक्के पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने या आठवड्यात राज्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. बुधवारी रात्री काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. दोन्ही धरणांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ सुरु झाली आहे. बुधवारी दिवसभर सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही.
तालुकानिहाय पाऊस
नगर ३०.२, पारनेर ४७.८, श्रीगोंदा ३४.५, कर्जत २४.३, जामखेड २४.२, शेवगाव ९.२, पाथर्डी १३.३, नेवासा ८.४, राहुरी १७.८, संगमनेर २९.९, अकोले ३९, कोपरगाव ११.५, श्रीरामपूर १२.५, राहता १८ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी २४.७ मिलीमिटर पाऊस झाला.
तर १५ ऑगस्टच्या आत भंडारधरण भरणार
पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर, रतनवाडीत धो-धो पाऊस सुरू असल्याने भंडारधरणात ३६ तासांत तब्बल १४०७ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हा हंगामातील विक्रम आहे. त्यामुळे ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा बुधवारी रात्री ७५९० दलघफू (६८.७७ टक्के) झाला होता. भंडारदरा धरण ७२% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरण १५ ऑगस्टच्या आतच भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अहमदनगर जिल्हयात आज अखेर ३१५.१० मि.मी. सरासरी पर्जन्याच्या ७०.३२% पर्जन्यमान झालेले आहे. अहमदनगर जिल्हयातून वाहणार्या गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर धरणातून ८,८०४ क्युसेकने ते भीमा नदी दौंड पूल येथून ४९,५९० क्युसेकने पाणी विसर्ग सुरु आहे. पुणे जिह्यात २४ जुलै रोजी अतिवृष्टी झालेली असून खडकवासला व इतर धरणांतुन विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पुणे व अहमदनगर जिल्हयात पर्जन्यमान सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. सदयस्थितीत बंडगार्डन, पुणे येथे १,०५,००० युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री दौंड पुल येथे भिमा नदीचा विसर्गामध्ये वाढ होवून विसर्ग १,००,००० ते १,५०,००० युसेक होण्याची शयता आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नदी काठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यातीने अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हयातील नांदुर मधमेश्वर धरणातुन गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन नाशिक व अहमदनगर जिल्हयात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्हयातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुयातील गोदावरी नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.