मुंबई। नगर सहयाद्री-
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. राज्यात मान्सून धडकल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता शेती कामांना वेग आला असून, या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
तर राज्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे तर काही जिल्ह्यात रिमझिम सुरु आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्यांच्या अंदाजानुसार, आज राज्यात पावासाचा जोर कायम राहणार आहे. आज कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अस आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.