पारनेर | नगर सह्याद्री
देशातील आणि विविध राज्यांतील सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून विविध जातीधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे, भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. असा आरोप लोकशाही व संविधान बचाव अभियानाचे प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांनी केला आहे.
देशातील विविध निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेतून इव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी लोकशाही व संविधान बचाव अभियानांतर्गत विवीध टप्प्यात आंदोलन सुरू आहे. या अभियानांतर्ग, सोमवारी तहसील कार्यालयावर संविधान सन्मान महमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरूवात झाली. मइव्हीएम हटाव,देश बचावफ अशा घोषणा देण्यात येत होत्या.आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी ते बोलत होते.करंदीकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. मणीपूर येथील महिलांवर सामुहिक अत्याचार होऊनही पंतप्रधान त्याबाबत चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे विविध घोटाळ्यांचे आरोप असणार्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन क्लिनचीट देण्याच काम घाऊक पध्दतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर अवघ्या चार दिवसात त्यांना भाजपमध्ये सामिल करून घेतले, उपमुख्यमंत्री पद दिले. आदर्श घोटाळ्याचा आरोप असलेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवण्याच्या घटना सध्या देशात वारंवार घडत असल्याचा आरोप करंदीकर यांनी केला.
यावेळी समाजसेवक डॉ. रफिक सय्यद, बाळासाहेब पातारे, संतोष वाडेकर, हसन राजे,अविनाश देशमुख, योगेश सोनवणे, बाळासाहेब शिरतार, रविंद्र साळवे, किरण सोनवणे, प्रदिप काळे, हिरामण सोनवणे, गोरख सुर्यवंशी, सुधीर खरात, रामहरी भोसले, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
प्रतिकात्मक ईएमव्ही मशीनची होळी
परीकथांमधील राजाचा प्राण एखाद्या पोपटामध्ये असे. त्याच धर्तीवर भारतीय जनता पक्षाचा व त्यांच्या सत्तेचा प्राण इव्हीएम मध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता इव्हीएमचा गळा घोटण्याचे काम करावे लागणार आहे. संपूर्ण देशात इव्हीएम हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र या आंदोलनाला प्रतिसाद कमी मिळत असल्याची खंत करंदीकर यांनी व्यक्त केली. यावेळी इव्हीएमच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली. आता प्रतिकृतीची होळी केली आहे. भविष्यात खरेखुरे इव्हीएम फोडण्याची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी सरकारने, प्रशासनाने पावले उचलावीत, इव्हीएम हटवावे असे आवाहन करंदीकर यांनी केले.