नवी दिल्ली-
राज ठाकरे यांनी काल (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे आणि भाजपची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र महायुतीत येण्याच्या बदल्यात मनसेला काय मिळणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. महायुतीत लोकसभेची एक किंवा दोन जागा मनसेला सोडल्या जातील अशी चर्चा सुरु आहे. तसेच विधानसभाही सोबत लढवू अशीही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
त्याचप्रमाणे या बैठकीत सध्या फक्त लोकसभा निवडणुकीविषयी बोलू, विधानसभेबाबत आता काहीच शब्द देणार नाही, असं अमित शाह यांनी राज ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेसोबत २०१९ मध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अमित शाह यांनी सावध भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे.
अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत मनसेने अमित शाह यांच्याकडे मुंबईतील दोन जागांची मागणी केली. यामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेचा समावेश आहे. मात्र मुंबईतून मनसेला दोन देणे कठीण असल्याचं अमित शाह यांनी राज ठाकरे यांना सांगितल्याची माहिती देखील समोर येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबतची राज ठाकरे यांनी अमित शाह यांना विचारला केली. कारण चार पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल. मात्र विधानसभेच्या जागांबाबत आताच काहीही आश्वासन देण्यास अमित शाह यांनी नकार दिला आहे. विधानसभेत सोबत लढू, मात्र जागावाटपाबाबत त्याच वेळी ठरवलं जाईल, असं देखील अमित शाह यांनी म्हटले आहे.